पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत देश, जिथे सर्व सरकारी सुविधा मिळतात फुकटात! येथील लोकांचा पगार ऐकून तर थक्क व्हाल

Published on -

खरं सांगायचं तर, जगात अशा काही ठिकाणांची नावं ऐकली की क्षणभर सगळं विसरून तिथं पोहोचायचं वाटतं. त्यातही जर आपण अशा देशाबद्दल बोलत असू जिथे शिक्षण, प्रवास आणि जगण्याच्या मूलभूत गरजा अगदी मोफत मिळतात, तर उत्सुकता वाढतेच. युरोपमधल्या एका छोट्याशा देशाने असंच काहीसं करून दाखवलं आहे. हा देश आकाराने लहान असला, तरी संपत्ती आणि जीवनमानाच्या बाबतीत मात्र तो अगदी आघाडीवर आहे. या देशाचं नाव आहे लक्झेंबर्ग. नाव ऐकून अगदी शांत, नीटनेटका आणि श्रीमंतीने नटलेला एक देश डोळ्यासमोर उभा राहतो आणि तो कल्पना नाही, तर वास्तव आहे.

कुठे आहे हा श्रीमंत देश?

लक्झेंबर्गची लोकसंख्या फारशी मोठी नाही. अवघ्या 6.5 लाख लोक इथे राहतात, पण दरडोई उत्पन्न आहे तब्बल 1.5 कोटी रुपये. इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात इतकी संपत्ती आहे की जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये लक्झेंबर्ग पहिल्या क्रमांकावर गणला जातो. या संपत्तीमागे मुख्य कारण म्हणजे इथलं मजबूत आर्थिक धोरण आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या वित्तीय सेवा. यामुळं जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांनी इथे आपलं मुख्यालय उघडलं आहे.

इथे विशेष म्हणजे किमान वेतनाची मर्यादाच आपल्या देशातल्या मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांइतकी आहे. साधारण 1 लाख रुपये इतका किमान पगार मिळतो. इतक्या वेतनामुळे सर्वसामान्य लोकांनाही दर्जेदार आणि सन्मानजनक आयुष्य जगता येतं. इतकंच नव्हे तर, इथं बस, ट्रेन आणि ट्रामसारख्या सार्वजनिक वाहतुकीची सर्व साधनं मोफत उपलब्ध आहेत. म्हणजेच, कोठेही जायचं असेल तरी तिकीटाचा विचार करायची गरज नाही. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, लोकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी, पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि ट्राफिकही कमी व्हावं.

शिक्षण, आरोग्य सेवा सर्वकाही मोफत

आणखी एक विलक्षण बाब म्हणजे इथलं शिक्षण. शाळांपासून ते विद्यापीठांपर्यंत शिक्षण पूर्णतः मोफत आहे किंवा अगदी कमी खर्चात उपलब्ध आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना शिक्षण घेण्यासाठी कोणतीही आर्थिक चिंता सतावत नाही. शिक्षणाशिवाय आरोग्याच्या सुविधाही इथे प्रगत आणि सहज उपलब्ध आहेत. सरकारी आरोग्य विम्यामुळे कोणत्याही महागड्या उपचारांसाठी लोकांना झळ बसत नाही.

स्वच्छता, सुरक्षितता आणि संयमित जीवनशैली यामुळं लक्झेंबर्गचा उल्लेख वारंवार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य देशांमध्ये केला जातो. इथलं गुन्हेगारीचं प्रमाण देखील अत्यंत कमी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!