हैदराबादच्या इतिहासात एक काळ असा होता, जेव्हा संपत्तीच्या कल्पनाही सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरच्या होत्या. याच काळात जन्म घेतलेल्या सहाव्या निजाम मीर मेहबूब अली खान यांचे आयुष्य म्हणजे विलासी जगण्याचा परमोच्च नमुना. त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीपासून ते त्यांच्या दागिन्यांच्या निवडीपर्यंत सर्व काही भव्य आणि झगमगाटाने भरलेले होते. पण या सगळ्या वैभवात एक गोष्ट अशी होती, जी आजही ऐकली की चकित व्हायला होतं. त्यांच्या टेबलावर पडलेली एक वस्तू, जी दिसायला जशी एक सामान्य पेपरवेट होती, ती खऱ्या अर्थाने कोट्यवधींच्या किंमतीचा हिरा होता, जेकब डायमंड.

निजाम मीर मेहबूब अली खान
निजाम मीर मेहबूब अली खान हे वयाच्या केवळ तीनव्या वर्षी हैदराबादच्या गादीवर आले आणि 1911 पर्यंत त्यांनी राज्य केलं. त्यांच्या कारकिर्दीत हैदराबाद नुसताच श्रीमंतीचा नव्हे, तर सांस्कृतिक तेजाचा केंद्रबिंदू होता. निजामांच्या दागिन्यांप्रती असलेल्या प्रेमामुळे त्यांच्या खजिन्यात अनेक दुर्मिळ रत्नं जमली होती. त्यातच सर्वात वेगळं आणि कुतूहल जागृत करणारं होतं ‘जेकब डायमंड’. जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा, ज्याचं वजन होतं तब्बल 184.75 कॅरेट्स.
या हिऱ्याची कहाणी तितकीच गूढ आहे जितकी त्याची चमक. सुरुवात झाली होती एका अर्धवट व्यापाऱ्याच्या योजनेने. अलेक्झांडर माल्कम जेकब नावाच्या एका रहस्यमय व्यक्तीने, जो अनेकांना गुप्तहेर वाटायचा, त्याने लंडनमधून हा हिरा 21 लाख रुपयांना विकत घेतला आणि निजामाला तो तब्बल 50 लाख रुपयांना विकण्याचा प्रस्ताव दिला. यात मध्यस्थ होता निजामचा खास नोकर अल्बर्ट आबिद, ज्याच्यावर निजाम पूर्ण विश्वास ठेवत. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन आबिदने स्वतःच्या फायद्यासाठी डाव खेळला.
निजामाने हा हिरा प्रत्यक्ष पाहिल्यावर केवळ एकच शब्द उच्चारला “नापसंत”. पण यामागे खरी कहाणी वेगळी होती. ब्रिटिश सरकार आणि निजामाच्या दरबारातील मंत्र्यांनी हा सौदा होऊ नये म्हणून दबाव आणलेला. हे प्रकरण नंतर कोर्टात गेले. जेकबने दावा केला की ‘नापसंत’ हे फक्त ब्रिटिशांना भुलवण्यासाठीच होतं. त्याने करार पूर्ण झाल्याचा दावा करत पैसे मागितले, पण काहीही मिळाले नाही. निकाल असा लागला की जेकब निर्दोष ठरला, पण त्याला पैसे मिळालेच नाहीत आणि हाच हिरा म्हणवला गेला ‘मनहूस’.
आता कुठे आहे ‘जेकब डायमंड’?
हा ‘मनहूस’ हिरा पुढे निजामाच्या जिवनात एक विस्मरणीय वस्तू बनून राहिला. अनेक वर्षांनंतर, त्याचा मुलगा आणि शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान याला तो हिरा वडिलांच्या जुन्या बुटात सापडला. आणि आश्चर्य म्हणजे, त्यांनी त्याचा उपयोग टेबलवर पेपरवेट म्हणून केला. इतक्या अमूल्य रत्नाचं असं सामान्य वापरात रूपांतर झालं, हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल.
पण हिऱ्याची ही कहाणी तिथेच थांबत नाही. नंतर एका ट्रस्टच्या ताब्यात गेलेला हा जेकब डायमंड भारत सरकारने 1995 मध्ये 13कोटी रुपयांना विकत घेतला. आज तो मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत सुरक्षित आहे.