हिमाचल प्रदेशाच्या थंडगार कुशीत, सोलन जिल्ह्यात एका उंच टेकडीवर उभं आहे एक असं शिवमंदिर, जे केवळ श्रद्धेचं नव्हे, तर रहस्य आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. या मंदिराचं नाव आहे जटोली शिवमंदिर. याचं वर्णन करायचं झालं, तर ते केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धाळूंच्या मनात दडलेली एक भावना आहे, जणू पर्वतांच्या कुशीतच शिव स्वयं विराजमान झाले आहेत.
जटोली शिवमंदिर

या मंदिराची गोष्ट जितकी भक्तिभावाने भरलेली आहे, तितकीच ती अचंबित करणारीही आहे. मंदिराच्या दगडांना जर तुम्ही हात लावला, तर त्यातून डमरूचा नाद ऐकू येतो, असं इथल्या लोकांचं ठाम मत आहे. आणि ज्यांनी तो अनुभव घेतलाय, त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि आनंद पाहण्यासारखं असतं. ही केवळ एक गूढ अनुभूती नसून, विज्ञानालाही थक्क करणारी एक रहस्यपूर्ण घटना आहे.
जटोली मंदिराचं स्वप्न सर्वप्रथम पाहिलं ते स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी. 1950 साली त्यांनी सोलनच्या या दुर्गम भागात एक भव्य शिवधाम उभारण्याचा निर्धार केला. अनेक अडचणी, नैसर्गिक आव्हानं आणि तब्बल 39 वर्षांच्या अखंड श्रमांनी हे स्वप्न हळूहळू आकार घेऊ लागलं. दुर्दैवाने स्वामीजींचं निधन 1983 मध्ये झालं, मंदिर पूर्ण होण्याच्या काही वर्षांपूर्वीच. मात्र त्यांच्या शिष्यांनी हे अपूर्ण स्वप्न जिवापाड जपलं आणि अखेर 2013 मध्ये मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आलं.
मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये
आज हे मंदिर 111 फूट उंच असून, आशियातील सर्वात उंच शिवमंदिर मानलं जातं. डोंगराच्या टोकावर उभं राहिलेलं हे मंदिर दूरवरूनही लक्ष वेधून घेतं. त्याची रचना दक्षिण भारतीय शैलीतील असून, उत्तर भारताच्या पर्वतरांगांमध्ये अशी वास्तु पाहणं हेच एक वेगळं आश्चर्य आहे. मंदिराच्या शिखरावर बसवलेला प्रचंड सोन्याचा कलश त्याच्या भव्यतेत अधिक भर टाकतो.
मंदिराच्या आत प्रवेश केला, की भव्य शिवलिंग समोर येतं. त्याच्याच शेजारी स्वामी कृष्णानंद यांची समाधी आहे, जणू ते आजही आपल्या शिवधामात उपस्थित आहेत, भक्तांवर लक्ष ठेवून. या ठिकाणाबद्दल एक पौराणिक समजूतही आहे की, भगवान शिव स्वतः या स्थळी काही काळ वास्तव्य करून गेले होते. त्यामुळे हे मंदिर केवळ भक्तिभावाचं नव्हे, तर ऐतिहासिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं ठरतं.
जटोली नाव कसं पडलं?
या मंदिराचं नाव जटोली कसं पडलं, याचं उत्तरही रंजक आहे. भगवान शिवाच्या जटांमुळे, आणि त्यांच्या इथल्या वास्तव्यामुळे, या ठिकाणाला जटोली म्हटलं जाऊ लागलं. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे या कोरड्या, निर्जन टेकडीवर आजही एक ‘जल कुंड’ आहे. हे पाणी इतकं शुद्ध आणि औषधी गुणधर्म असलेलं मानलं जातं की, त्वचेचे आजारही त्यात स्नान केल्याने बरे होतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, स्वामी कृष्णानंद परमहंस यांच्या तपश्चर्येमुळेच हे पवित्र जल येथे निर्माण झालं.