हत्ती हा अत्यंत बुद्धिमान, कुटुंबकेंद्रित, भावनाशील आणि जगभरात सांस्कृतिकदृष्ट्याही आदराने पाहिला जाणारा प्राणी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की आपण जे हत्ती पाहतो किंवा त्यांच्याबद्दल वाचतो, ते फक्त एकाच प्रकारात मोडत नाहीत? आज जगभरात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती अस्तित्वात आहेत, आणि त्यांच्यामध्ये दिसण्यात, वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतींमध्ये कमालीचे फरक आहेत.
आफ्रिकन बुश हत्ती

हत्तींची सर्वात मोठी जात म्हणजे आफ्रिकन बुश हत्ती, ज्यांना सवाना हत्ती असंही म्हटलं जातं. हे विशालकाय हत्ती उप-सहारा आफ्रिकेतील विस्तीर्ण जंगलांमध्ये आणि घनदाट सवाना प्रदेशात राहतात. त्यांची उंची, वजन आणि कानांची मोठी आकारमान ही त्यांची खास ओळख ठरते. बोत्सवाना, केनिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेसह तब्बल 23 देशांमध्ये हे हत्ती आढळतात.
आफ्रिकन वन्य हत्ती
दुसरीकडे, आफ्रिकन वन्य हत्ती हे या प्रजातीपेक्षा थोडे लहान असतात. त्यांचे कान अधिक गोलसर आणि सोंड सरळ असते. ते मुख्यतः काँगो, गॅबॉन, लायबेरिया आणि घानासारख्या घनदाट जंगल असलेल्या प्रदेशांमध्ये वास्तव्यास आहेत. या हत्तींना पाहणं दुरापास्त ठरतं कारण त्यांचे निवासस्थान सतत नष्ट होत चालले आहे.
आशियाई हत्ती
आशियाई हत्तींची गोष्ट थोडी वेगळी आहे. भारत, नेपाळ, थायलंड, व्हिएतनामसह 13 देशांमध्ये हे हत्ती आढळतात. ही जात सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप वेगळी आहे.त्यांच्या गटांमध्ये वृद्ध मादी हत्ती मार्गदर्शन करत असते आणि संपूर्ण कळप तिच्या मागे चालतो.
भारतीय हत्ती
भारतीय हत्ती, हे आशियाई हत्तींच्या उपप्रजातींपैकी एक असून भारतात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांचे शरीर आफ्रिकन हत्तींइतकं मोठं नसतं, पण शरीरात जवळपास 1,50,000 स्नायू असल्यामुळे त्यांची ताकद वाखाणण्याजोगी आहे. भारताबाहेर हे भूतान, म्यानमार, बांगलादेश आणि लाओसमध्येही आढळतात.
श्रीलंकेचा हत्ती हा आशियाई हत्तींच्या सर्वांत मोठ्या उपप्रजातींपैकी एक आहे. त्यांची शरीरयष्टी अधिक स्थूल असते आणि विशेष म्हणजे श्रीलंकेमध्ये त्यांना राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळालेला आहे. मात्र आज हे हत्ती संकटात आहेत, कारण केवळ 4,000 इतकेच उरलेले आहेत.
सुमात्रन हत्ती
सुमात्रन हत्ती हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतात आणि आशियाई हत्तींमध्ये आकाराने सर्वांत लहान असतात. त्यांचा रंग हलका असून ते जंगलातील जैवविविधतेसाठी खूप महत्वाचे मानले जातात. कारण त्यांच्या फिरण्यामुळे बिया वेगवेगळ्या ठिकाणी पसरतात आणि जंगल अधिक सशक्त होतं.
आफ्रिकन पिग्मी हत्ती
आफ्रिकन पिग्मी हत्ती हे जगातील सर्वात लहान हत्ती आहेत. जरी ते वन्य हत्त्यांचीच उपजात असले, तरी त्यांचे अस्तित्व अधिवास नष्ट होणे, अतिक्रमण आणि शिकारीमुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे ते पाहणं फारच दुर्मिळ होत चाललं आहे.
बोर्नियो पिग्मी हत्ती
शेवटी, बोर्नियो पिग्मी हत्ती एक फारच वेगळी आणि मनोरंजक उपजात. सुमारे 3,00,000 वर्षांपूर्वी आशियाई हत्त्यांपासून वेगळे झालेले हे हत्ती बोर्नियो बेटावर आढळतात. त्यांच्या तुलनेत त्यांचे कान, शेपटी आणि सोंड मोठ्या असतात, आणि त्यांचा स्वभावही अधिक सौम्य मानला जातो.