जगात प्रत्येक नात्याचा अर्थ त्याच्या काळातच समजतो. कोण आपलं खरं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी जवळ आहे, हे वेळच ठरवते. आयुष्यात अनेकदा आपण लोकांवर विश्वास ठेवतो, त्यांच्यावर आपलं सर्वस्व उधळतो, पण शेवटी आपल्याला कळतं की काहीजण फक्त गरज म्हणून आपल्या आयुष्यात येतात. याच संदर्भात आचार्य चाणक्यांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली नीती आजही तितकीच सत्य आणि उपयुक्त आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, आयुष्यात कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून सावध राहावं, याचं भान ठेवलं नाही, तर मोठं नुकसान होऊ शकतं.

घरातील नोकर
चाणक्यांच्या मते, चार प्रकारच्या लोकांचे हेतू तुम्ही वेळेत ओळखले, तर तुमची फसवणूक होणार नाही आणि तुम्हाला कधीही आयुष्यात अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही. यात सर्वप्रथम येतो तुमच्याकडे काम करणारा नोकर. हा व्यक्ती रोज तुमच्याशी, तुमच्या घराशी जोडलेला असतो. पण जर तो आपल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडत नसेल, तर त्याच्या वागणुकीकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आर्थिकच नाही तर मानसिक नुकसानही सहन करावं लागू शकतं. म्हणून चाणक्य सांगतात, अशा व्यक्तींची परीक्षा घेणं गरजेचं आहे.
नातेवाईक
दुसरा गट आहे नातेवाईकांचा. संकटाच्या क्षणी कोण तुमच्या पाठीशी उभं राहतं, हेच तुमचं खरं नातं असतं. जर कोण नातेवाईक केवळ गोड बोलून वेळ निभावतो पण कठीण वेळी तुम्हाला मदतीचा हात देत नाही, तर अशा नात्यांपासून दूर राहणंच योग्य. चाणक्यांनी याचसाठी सांगितलं की, नातेवाईकांची खरी ओळख संकटाच्या वेळीच होते.
चांगला मित्र
मित्रांविषयी तर चाणक्यांचे विचार अधिक स्पष्ट आहेत. ते म्हणतात, एक चांगला मित्र हीच खरी संपत्ती आहे. पण तुमच्या आयुष्यात अंधाराचे दिवस असताना जो मित्र तुमच्यासोबत राहतो, तोच तुमचा खरा मित्र असतो. संकटात पाठ फिरवणारे मित्र म्हणजे नुसतं नात्याचं आवरण. अशा मित्रांचं मूल्य आयुष्यात कमीच असतं.
पत्नी
शेवटचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पत्नी. चाणक्य एक वेगळाच दृष्टिकोन मांडतात. ते म्हणतात की, पत्नीची खरी परीक्षा तिच्या पतीच्या यशाच्या काळात घ्यावी. कारण अशा काळात जर ती नम्र, सहकारी आणि समजूतदार राहिली, तर ती खऱ्या अर्थाने पतीची जीवनसाथी ठरते. पण जर ती केवळ सुखाच्या काळातच पाठीशी असेल आणि अडचणीच्या वेळी दुर्लक्ष करत असेल, तर त्यावर विचार करायला हवा.