एक मुलगी जेव्हा विवाहबंधनात अडकते, तेव्हा ती एका नव्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करत असते. तिचे पाय एका नवीन घरात पडतात, नवे नाते, नवे लोक आणि एक नवीन जबाबदारी तिच्या वाट्याला येते. अशा वेळी तिच्या पालकांची एकच इच्छा असत की ती नव्या घरात सुखी राहो, तिचं नातं मजबूत राहो आणि ती सासरच्यांच्या मनात कायम आपली जागा निर्माण करो. यासाठी, काही पारंपरिक पद्धतींनी मदत होऊ शकते, ज्या केवळ धार्मिकच नाहीत, तर त्यामागे भावनिक आधारदेखील असतो.
भारतीय विवाहसंस्कृतीत लग्नाच्या दिवशी मुलीच्या दुपट्ट्यात काही खास वस्तू बांधण्याची परंपरा आहे. यामागील श्रद्धा अशी आहे की या गोष्टी तिच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, शांतता आणि प्रेम घेऊन येतात. तिचं वैवाहिक जीवन फुलावं आणि ती नवऱ्याच्या घरात राणीप्रमाणे राज्य करावी, यासाठी या छोट्या पण अर्थपूर्ण गोष्टींचा समावेश केला जातो.

हळद
सर्वप्रथम, येते हळद. हळद ही शुभतेचे प्रतीक मानली जाते. ती आरोग्यदायी, पवित्र आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करणारी असते. जेव्हा वधूच्या दुपट्ट्यात हळदीची छोटी गाठ बांधली जाते, तेव्हा तिच्या नव्या जीवनासाठी शुभेच्छा आणि संरक्षणाचं कवच तयार केलं जातं.
1 रुपयाचे नाणे
दुसरी गोष्ट म्हणजे 1 रुपयाचे नाणे. आर्थिक स्थैर्य आणि धनलाभाची इच्छा प्रत्येक पालकाला असते. नाणं ही केवळ पैशाची खूण नसून, ती नव्या घरात तिचं वर्चस्व, स्थिरता आणि भरभराटीचं प्रतीक असते. ही एक छोटी पण अर्थपूर्ण गाठ भविष्यातल्या अडचणी सहज पार करण्याचं सामर्थ्य देते.
दुर्वा
तिसरी वस्तु आहे दुर्वा, जी गणपतीच्या पूजेत अत्यंत आवश्यक मानली जाते. मंगलकारी आणि शांततेचं प्रतीक असलेल्या दुर्वेमुळे नवविवाहितेच्या जीवनात तणावमुक्तता आणि संतुलन येईल, अशी धारणा आहे. नवरा-बायकोच्या नात्यात समजूत आणि सामंजस्य वाढावं, यासाठी दुर्वेचं स्थान महत्त्वाचं आहे.
अक्षत
तसेच अक्षत, म्हणजेच अखंड तांदूळ. हे शुभ कार्याचे आणि सातत्याचं प्रतीक आहे. वधूच्या जीवनात प्रत्येक गोष्ट अखंड, सुस्थितीत आणि समाधानकारक राहो, ही भावना या अक्षतांद्वारे व्यक्त केली जाते.
फूल
आणि शेवटी, एक फूल. जसं एक फूल सौंदर्य, कोमलता आणि सुगंधाचं प्रतीक आहे, तसंच मुलीचं आयुष्यही त्या फुलासारखं बहरावं, प्रेमळ आणि हसतमुख राहावं, यासाठी तिच्या दुपट्ट्यात एक टवटवीत फूल बांधलं जातं. यामागील भावना खूपच हळवी असते ती म्हणजे मुलगी जिथे जाईल, तिथं आनंद घेऊन जावी.