भारतात आजही लाखो लोक कर्करोगाशी झुंज देत आहेत. आधुनिक वैद्यकीय प्रगती असूनही, या आजारामुळे हजारो रुग्ण आपले प्राण गमावत आहेत. विशेषतः काही प्रकारचे कर्करोग भारतात अधिक प्रमाणात आढळतात आणि ते अत्यंत धोकादायक ठरतात. भारतीय समाजात या आजाराबद्दल अजूनही पुरेशी जागरूकता नसल्याने अनेक वेळा निदान उशिरा होते आणि उपचार करण्याचा कालावधी मर्यादित राहतो. खाली दिलेले 5 कर्करोगाचे प्रकार भारतात सर्वाधिक आढळणारे आहेत. त्यापैकी शेवटचा प्रकार पुरुषांसाठी अधिक प्राणघातक मानला जातो.

फुफ्फुसांचा कर्करोग
फुफ्फुसाचा कर्करोग हा भारतात आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. यामध्ये फुफ्फुसांमधील पेशींची अनियंत्रित वाढ होते, ज्यामुळे ट्यूमर तयार होतो. हा ट्यूमर इतर अवयवांमध्येही पसरू शकतो. धूम्रपान, तंबाखू सेवन आणि वायू प्रदूषण ही प्रमुख कारणं आहेत. विशेषतः शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसतात.
स्तनाचा कर्करोग
स्तनाचा कर्करोग महिलांमध्ये सर्वाधिक आढळतो. सध्या प्रत्येक 28 महिलांपैकी 1 महिलेला आयुष्यात कधीतरी या आजाराचा सामना करावा लागतो. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, हार्मोनल बदल आणि अनुवांशिकता यामुळे हा कर्करोग वाढतो. वेळेवर तपासणी केल्यास हा आजार नियंत्रित करता येऊ शकतो. पण भारतात अनेक महिलांना त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने निदान उशिरा होते.
कोलोरेक्टल कर्करोग
या प्रकारातील कर्करोग मोठ्या आतड्यांमध्ये किंवा मलाशयात होतो. पाचनसंस्थेशी संबंधित असलेला हा कर्करोग ‘पॉलीप्स’ नावाच्या गाठीतून सुरू होतो, ज्यामुळे नंतर कर्करोग तयार होतो. भारतात सध्या पचायला कठीण अन्न, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, कमी फायबर्स असलेला आहार यामुळे आतड्यांचे विकार वाढले आहेत, त्यामुळे कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे.
प्रोस्टेट कर्करोग
पुरुषांमध्ये आढळणारा आणखी एक सामान्य कर्करोग म्हणजे प्रोस्टेट कर्करोग. तो मूत्राशयाच्या खालच्या भागात असलेल्या प्रोस्टेट ग्रंथीत होतो. ही ग्रंथी वीर्य तयार करण्यास मदत करते. 60 वर्षांवरील पुरुषांमध्ये या प्रकारचे प्रमाण अधिक असते. सुरुवातीला कोणतेही लक्षण दिसत नाही, पण नंतर लघवी करताना त्रास, रक्त येणे, पाठदुखी अशी चिन्हं दिसू लागतात.
तोंडाचा कर्करोग
भारतात पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारा आणि धोकादायक ठरणारा कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्करोग. तोंडाच्या आतील बाजू, ओठ, जीभ आणि गाल याठिकाणी या कर्करोगाचा परिणाम होतो. तंबाखू, गुटखा, सुपारी यांचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हा कर्करोग प्रचंड वेगाने वाढतो. दरवर्षी सुमारे 77,000 पेक्षा जास्त पुरुष तोंडाच्या कर्करोगाचे बळी ठरतात. लवकर निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो, मात्र उशीर झाल्यास त्याचे परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात.