टॉप 100 फूड सिटीजमध्ये ‘या’ 6 भारतीय शहरांचा समावेश, खवय्यांची मनं जिंकणारे हे पदार्थ कोणते? पाहा यादी

Published on -

जगभरात प्रत्येक शहराची एक खास ओळख असते, पण काही शहरं अशी असतात जिथे स्वाद आणि सुगंध यांची स्वतःची संस्कृती असते. भारतातही काही शहरं आहेत जी केवळ त्यांच्या ऐतिहासिक वारशामुळे नव्हे, तर तिथल्या खास खमंग पदार्थांमुळे ओळखली जातात. अलीकडेच जगप्रसिद्ध फूड गाईडने प्रसिद्ध केलेल्या “टॉप 100 फूड सिटीज” यादीत भारतातील 6 शहरांना स्थान मिळालं आहे. ही केवळ एक यादी नाही, तर प्रत्येक शहराच्या स्वादिष्ट प्रवासाची एक जागतिक मान्यता आहे.

मुंबई

या यादीत भारताचं प्रतिनिधित्व करत सर्वात वरचं स्थान पटकावलं आहे मुंबईने. संपूर्ण जगात 5 व्या क्रमांकावर असलेल्या या शहरात चव आणि चैतन्याचा एक अनोखा संगम आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ मिळणारा वडापाव, पावभाजी, मसाला डोसा, तळलेला बॉम्बे डक आणि कबाब हे मुंबईच्या जीवंत खाद्यसंस्कृतीचे मुख्य रंग आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत मुंबईच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला एक नवा स्वाद भेटतो, जो फक्त याच शहराला शोभतो.

अमृतसर

या यादीत 43 व्या स्थानावर आहे अमृतसर. पंजाबच्या या शहरात फक्त जेवण नाही, तर एक श्रद्धेची आणि प्रेमाची चव असते. सुवर्ण मंदिरात रोज हजारो भाविकांसाठी दिलं जाणारं लंगर हे एक सामूहिक भक्तिभावाचं प्रतीक आहे. इथला अमृतसरी कुलचा, छोले आणि घटाघट प्यायली जाणारी लस्सी हे सर्वच पदार्थ केवळ पोट भरत नाहीत, तर मनही तृप्त करतात.

दिल्ली

दिल्लीला या यादीत 45व्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे. राजधानीचे पदार्थ म्हणजे आपल्या इतिहासाचे आणि विविधतेचे जिवंत दर्शन. चांदणी चौकातील झणझणीत चाट, ताज्या पराठ्यांची गल्ली, ओल्ड दिल्लीतील बटर चिकन, बैदा रोटी आणि नल्ली निहारी प्रत्येक थाळीत एक कहाणी सांगणारे पदार्थ. दिल्लीत तुम्ही खाण्याच्या आनंदासोबत शहराच्या आत्म्याशीही जोडले जातात.

हैदराबाद

हैदराबाद हे 50 व्या स्थानावर आहे आणि हे शहर म्हणजे बिर्याणीचा अधिराज्य. निजामांच्या स्वयंपाकघरातून आलेली ही बिर्याणी आज जगभरात प्रसिद्ध आहे. हलीम, मिर्ची का सालन, आणि गोडसर डबल का मीठा हे इथले पारंपरिक पदार्थ खाद्यप्रेमींना मंत्रमुग्ध करतात. हैदराबादमध्ये खाणं म्हणजे इतिहासाची आणि मसाल्यांची एक अद्भुत सफर.

चेन्नई

चेन्नई या दक्षिणेकडच्या सांस्कृतिक केंद्राने 75 व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. इथली सकाळ उकडलेल्या इडलीने आणि संध्याकाळ फिल्टर कॉफीने सुरू होते. डोसा, वडा, सांभार-तांदूळ, लिंबू भात आणि चेट्टीनाड शैलीतल्या मसालेदार करी या सर्वात एक पारंपरिक भाव आहे. चेन्नईचं जेवण म्हणजे शुद्ध, साधं आणि समाधानी करणारं.

कोलकाता

शेवटी, 71 व्या स्थानावर आहे कोलकाता एक असं शहर जिथे खाणं ही एक कलाच आहे. दिवसाची सुरुवात पुचका आणि काठी रोलने करावी, नंतर कोशा मंगशो किंवा इलिश माचसारख्या मासेभाताचा आस्वाद घ्यावा. शेवटी मिष्टान्नात रसगुल्ला, संदेश आणि मिस्टी दोई यांच्याने आपल्या जेवणाचा पूर्णविराम द्यावा.

जगात प्रथम क्रमांक पटकावलं आहे इटलीमधील नेपल्स या शहराने. पिझ्झा, पास्ता आणि पारंपरिक इटालियन मिठाई स्पोग्लियाटेला यांचं माहेरघर. पण भारतीय शहरांनी जी ही स्थानं मिळवली आहेत, ती जागतिक पातळीवर आपल्या खाद्यपरंपरेचं मोठं प्रतिनिधित्व आहे. या शहरांमधून फक्त स्वाद नाही तर भारतीयतेचा गंधही जगभर पसरतोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!