जगाच्या कानाकोपऱ्यांत, निसर्गाने आपल्या कलेचं असं काही सुरेख प्रदर्शन केलं आहे की ते पाहून माणूस थक्क होतो. आपल्याला वाटतं की इंस्टाग्राम फिल्टर किंवा एडिटिंग अॅप्स सुंदरतेची कमाल दाखवतात, पण निसर्ग स्वतःचं सौंदर्य ज्या सहजतेने आणि नैसर्गिकतेने सादर करतो, त्याचं कोणतंही मानवनिर्मित रूप काय तोडणार? या लेखात आपण अशाच काही रंगीबेरंगी आणि बुद्धिमान प्राण्यांविषयी जाणून घेणार आहोत, जे पृथ्वीवर सौंदर्य, सृष्टी आणि सजगतेचा जिवंत पुरावा आहेत.
मेंडरिन मासा

पॅसिफिक महासागराच्या निळ्याशार खोल समुद्रात मेंडरिन मासा एका छोट्याशा चमत्कारासारखा दिसतो. निळसर, हिरवट आणि केशरी रंगांनी सजलेला हा मासा केवळ आकर्षक दिसत नाही, तर त्याचे रंग प्रकाशावर आधारित नसून प्रत्यक्ष रंगद्रव्यांमधून तयार होतात. म्हणूनच तो समुद्राच्या तळाशीही तितकाच भासतो जितका दिव्याखाली झळकतो. निसर्गाने त्याला केवळ रंगच नव्हे, तर एक वेगळं तेज दिलं आहे.
पँथर गिरगिट
दुसरीकडे मादागास्करच्या जंगलात वावरणारा पँथर गिरगिट (सरडा)आपल्या रंगबदलाच्या विलक्षण क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. तापमान, भावना, किंवा समोर कोण आहे यावरून तो आपला रंग बदलतो. त्याच्या त्वचेतील पेशी अशा प्रकारे कार्य करतात की संपूर्ण शरीर एक रंगीबेरंगी कोडं बनतं. तो नुसताच सुंदर नाही, तर संवाद साधण्याचं अत्यंत हुशार माध्यमही आहे.
भारतीय मोर
भारतीय मोर म्हणजे सौंदर्य आणि सन्मानाचं प्रतीक. त्याच्या झळाळत्या निळ्या-हिरव्या पिसांमध्ये केवळ रंग नव्हे तर एक मोहक गूढतेचं दर्शन घडतं. या रंगांचा उगम प्रत्यक्ष रंगद्रव्यांतून नसून, पिसांमधील अतिसूक्ष्म रचनांमधून प्रकाश परावर्तीत होतो. जेव्हा तो आपल्या पिसांचा पंखा उघडतो, तेव्हा ते दृश्य मन मोहित करते.
ब्ल्यू रिंग ऑक्टोपस
अत्यंत धोकादायक असूनही पाहायला मोहक असणारा ब्ल्यू रिंग ऑक्टोपस आपल्या शरीरावर चमकदार निळ्या वर्तुळांनी सावधगिरीचा इशारा देतो. त्याच्या शरीरात अत्यंत विषारी रसायनं असतात, मात्र त्याच्या रंगीबेरंगी पद्धतीने तो भक्षकांना आधीच दूर ठेवतो.
इंद्रधनुष्य लोरिकेट
इंद्रधनुष्य लोरिकेट नावाचा एक चंचल, बोलका आणि आनंदी पक्षी ऑस्ट्रेलियाच्या आकाशात झेप घेतो. निळं डोकं, हिरवट पंख, नारिंगी छाती आणि पिवळसर पोट असलेल्या या पक्ष्याला पाहून कुणालाही थक्क व्हायला होतं. त्याचं वर्तनही तितकंच मैत्रीपूर्ण आणि उत्साही असतं.
विषारी डार्ट बेडूक
मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या घनदाट जंगलात राहणारा विषारी डार्ट बेडूक छोटा असला तरी त्याचं अस्तित्व भलीमोठी हाक देतं. आकाशी निळ्या रंगापासून ते तेजस्वी लालपर्यंत विविध रंगांमध्ये असलेली त्याची त्वचा केवळ आकर्षक नाही, तर एका मोठ्या इशाऱ्यासारखी असते, ‘माझ्या जवळ येऊ नकोस’. त्याच्या शरीरातील विषकारी संयुगे भक्षकांना दूर ठेवतात आणि तो जणू रंगांच्या माध्यमातूनच स्वतःचं संरक्षण करतो.