‘या’ आहेत जगातील सर्वात जास्त रेंज देणाऱ्या टॉप-10 मिसाईल्स, यादीत भारताच्या ‘अग्नि-V’चेही नाव!

जगभरात संरक्षण तंत्रज्ञानात सातत्याने प्रगती होत असताना, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आज प्रत्येक देशाच्या युद्ध रणनीतीचा अविभाज्य भाग ठरत आहेत. ही अशी शस्त्रे आहेत जी हजारो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यांवर अत्यंत अचूकपणे आणि प्रचंड विध्वंसक क्षमतेने हल्ला करू शकतात. त्यामुळे कोणत्या देशाकडे किती दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, याकडे जगाचे लक्ष असते.

या यादीत एक आश्चर्य म्हणजे उत्तर कोरियासारख्या तुलनेने लहान आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशाकडे दोन आघाडीची क्षेपणास्त्रे आहेत. तर दुसरीकडे, भारतासारखा उदयोन्मुख महासत्ता अजूनही यादीच्या शेवटच्या टोकाकडे आहे. यामागे अनेक कारणं आहेत, ज्यात धोरणात्मक संयम, सुरक्षेची गरज, जागतिक दडपणं आणि तांत्रिक अडचणी यांचा समावेश होतो.

‘RS-28 Sarmat’ रशिया

या यादीत सगळ्यात वर आहे रशियाचे ‘RS-28 Sarmat’ क्षेपणास्त्र, ज्याला ‘सैतान-2’ असं भयावह नाव देण्यात आलं आहे. याची श्रेणी तब्बल 18,000 किलोमीटर आहे, म्हणजे पृथ्वीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत सहज मारा करू शकतो. त्याचबरोबर, रशियाचंच एक जुनं पण अजूनही सक्रिय असलेलं R-36M (SS-18 Satan) हे 16,000 किलोमीटरपर्यंत पोहोचतं.

DF-41 चीन

चीनही या शर्यतीत मागे नाही. त्यांचं DF-41 हे क्षेपणास्त्र 12,000 ते 15,000 किलोमीटर अंतर पार करू शकतं. याशिवाय, पाणबुडीवरून डागता येणाऱ्या Trident-II D5 (अमेरिका), JL-3 (चीन) आणि M51 (फ्रान्स) सारखी क्षेपणास्त्रेही या यादीत आहेत.

ह्वासोंग-15 आणि ह्वासोंग-17

उत्तर कोरियाने आश्चर्यचकित करत आपल्या ह्वासोंग-15 आणि ह्वासोंग-17 सारख्या क्षेपणास्त्रांनी जागतिक लष्करी तज्ञांनाही विचारात पाडले. ह्वासोंग-17 ची श्रेणी 15,000 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचं मानलं जातं, तर ह्वासोंग-15 ही 13,000 किलोमीटरवर मारा करू शकते, जे थेट अमेरिकेपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे.

भारताचं अग्नि-V

भारताचं अग्नि-V हे सर्वात लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र सध्या सुमारे 7,000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं. हे क्षेपणास्त्र MIRV (Multiple Independently targetable Reentry Vehicle) प्रणालीसह विकसित करण्यात आलं आहे, म्हणजे एकाच क्षेपणास्त्रामधून अनेक लक्ष्यांवर वेगवेगळ्या दिशेने मारा करता येतो. मात्र, तरीही हे क्षेपणास्त्र यादीत तळाशी का आहे याचं उत्तर भारताच्या धोरणात आहे. भारत ‘No First Use’ चा सिद्धांत मानतो आणि अण्वस्त्रांचा वापर केवळ संरक्षणासाठीच करेल, असा स्पष्ट संकेत अनेक वेळा देत आला आहे.