काही लोकांच्या आयुष्यात नशीब अगदी जन्माच्या क्षणापासूनच त्यांच्यासोबत असतं. काही चेहरे असे असतात की त्यांच्या भोवती एक प्रकारची तेजस्वी लहर असते, जणू काही नशिबाने त्यांना खास निवडलंय. अंकशास्त्रामध्ये देखील अशाच काही संख्यांना विशेष महत्त्व दिलं जातं, आणि त्यात ‘3’ ही संख्या अगदी वरच्या क्रमांकावर आहे. ही केवळ एक संख्या नसून, ती सौंदर्य, भाग्य आणि सर्जनशीलतेचं प्रतीक मानली जाते.

अंक 3
‘3’ ही संख्या असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह म्हणजे गुरु जो शहाणपण, विस्तार, सन्मान आणि आध्यात्मिक प्रगती दर्शवतो. जेह, करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा धाकटा मुलगा, ज्याचा जन्म 21 फेब्रुवारी रोजी झाला त्याचा भाग्यांकसुद्धा ‘3’ आहे. त्यामुळेच तो जन्मतःच नशिबाचा सोनेरी चमचा घेऊन आलेला मानला जातो.
अशा मुलांना आयुष्यात मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतोच असं नाही. त्यांची व्यक्तिमत्त्वं इतकी प्रभावशाली असतात की लोक त्यांच्या भोवती आकर्षित होतात. त्यांना आयुष्यात संधी मागाव्या लागत नाहीत, त्या त्यांच्या वाट्याला आपोआपच येतात. त्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि धाडसी दृष्टिकोन त्यांना वेगळं बनवतो. अनेक वेळा हे लोक अभिनय, गायन, चित्रकला किंवा लेखन अशा क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करतात.
‘3’ आकड्याचे लोक मोठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला मागेपुढे पाहत नाहीत. पण त्याचवेळी त्यांना कोणाचाही सल्ला ऐकायला फारसा आवडत नाही. त्यांचं मन स्वच्छंद, विचार स्वतंत्र आणि स्वाभिमान खूप प्रबळ असतो. हेच त्यांच्या यशामागचं गुपित असतं.
विशेष गुण
या लोकांची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं संयम आणि समस्यांवर झटपट तोडगा काढण्याची कला. त्यांना एखादा अडथळा आला, की ते गोंधळ न उडवता, क्षणात उपाय शोधतात. त्याचबरोबर त्यांचं मन अत्यंत तीव्र असतं. अभ्यासात त्यांना सहजच गती मिळते, आणि ते ज्ञानातही अव्वल ठरतात.
पण इतक्या चांगल्या गुणांमध्येही काही सावल्याही असतात. ‘3’ क्रमांकाच्या लोकांमध्ये थोडासा अहंकार असतो आणि ते एखादी गोष्ट लवकर सांगत नाहीत. अनेक वेळा ते आपल्या खऱ्या भावना किंवा सत्य लोकांपासून लपवतात. यामुळे त्यांना समजणं कठीण जातं. त्यांच्या निर्णयांमध्ये कधी कधी घाई असते, आणि यामुळे चुका होऊ शकतात.
शुभ रंग आणि जोडीदार
त्यांच्या जीवनात गुरुवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसेच, पिवळा, नारिंगी आणि लाल हे रंग त्यांच्यासाठी भाग्यवर्धक असतात. सोनं हा त्यांचा प्रमुख भाग्यकारक धातू मानला जातो, त्यामुळे सोन्याचे दागिने घालणं त्यांच्या सौख्यासाठी हितावह ठरतं.
‘3’ अंकाचे लोक ‘1’, ‘2’ आणि ‘9’ अंकाच्या लोकांशी चांगले संबंध ठेवतात, तर ‘5’ आणि ‘6’ अंकाचे लोक त्यांच्या नशिबाला फारसे पूरक नसतात.