अंतराळात ‘या’ सामान्य अन्नपदार्थांवर बंदी! मग AXIOM-4 मोहिमेत शुभांशू शुक्ला नेमकं काय खाणार? जाणून घ्या अंतराळातील नियम

Published on -

शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळप्रवासामुळे देशभरात एक नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे, अंतराळात अंतराळवीर काय खात असतील? त्यांना अन्न कसं दिलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचं, काही पदार्थांवर बंदी का असते? आपण जिथं जेवणाला एक नैसर्गिक गोष्ट मानतो, तिथं अंतराळात मात्र त्याला एक मोठं विज्ञान आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या सारख्या अंतराळवीरांसाठी अन्नाची निवड कशी केली जाते आणि काही आपल्या दैनंदिन जेवणातील पदार्थ अंतराळात का नेले जाऊ शकत नाहीत.

अंतराळवीर नेमकं काय खातात?

अंतराळात स्वयंपाक करणं आणि खाणं हे पृथ्वीवर जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नसतं. तिथं गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे पदार्थ हवेत तरंगतात, आणि त्यामुळे खाण्याचं प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक नियोजन करून केलं जातं. अंतराळातल्या मेनूमध्ये बऱ्याचदा फ्रीज-ड्राईड पदार्थांचा समावेश असतो. मॅकरोनी अँड चीज, चिकन आणि भाज्यांचे मिश्रण, तृणधान्यं, काजू, फळं आणि ब्राउनी यांसारख्या वस्तू अंतराळवीरांना दिल्या जातात. हे अन्न हलकं, पौष्टिक आणि दीर्घकाळ टिकणारं असतं.

पण काही अन्नपदार्थ असे आहेत, जे अंतराळात घेऊन जाणं धोकादायक ठरतं आणि त्यामुळे त्यांच्यावर बंदी आहे. उदाहरणार्थ, ब्रेड हे त्यापैकी एक. आपण इथे ब्रेड सहज खाऊ शकतो, पण अंतराळात त्याचे छोटे-छोटे तुकडे हवेत तरंगतात आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणांमध्ये अडकू शकतात, ज्यामुळे उपकरण बिघडण्याचा धोका निर्माण होतो. शिवाय, हे तुकडे अंतराळवीरांच्या डोळ्यात जाऊन इजा करू शकतात.

‘या’ पदार्थांवर असते बंदी

असाच धोका मीठ आणि मिरपूडीसारख्या सूक्ष्म पदार्थांमध्येही असतो. त्यांचे सूक्ष्म कण हवेत उडू शकतात आणि डोळे किंवा उपकरणांसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच, मीठ आणि मिरपूड द्रव स्वरूपात दिली जातात, म्हणजे ती योग्य प्रमाणात आणि सुरक्षितपणे वापरता येतील.

तसेच, आपण ज्या थंड आणि कार्बोनेटेड पेयांचा आनंद घेतो, ते देखील अंतराळात अशक्यच आहे. गुरुत्व नसल्यामुळे पेयातील वायू आणि द्रव वेगळे होत नाहीत. त्यामुळे पोटात वायू साचतो आणि ‘ओले ढेकर’ सारख्या अडचणी येतात. म्हणूनच, अंतराळात फक्त पाणी, लिंबूपाणी किंवा खास बनवलेले कोरडे पेयच पिलं जातं.

 

दूध हे अजून एक उदाहरण आहे. ते लवकर खराब होतं आणि अंतराळात रेफ्रिजरेटर नसल्यामुळे ते बरोबर नेता येत नाही. त्यामुळे दुधाचा कोरड्या स्वरूपात (पावडर) वापर केला जातो. अल्कोहोल तर पूर्णपणे बंदी असलेला पदार्थ आहे. केवळ मेंदूवर परिणाम होतो म्हणून नाही, तर यानाच्या पाण्याच्या पुनर्वापर प्रणालीवरही त्याचा वाईट परिणाम होतो.

अंतराळवीरांचं अन्न केवळ त्यांना जगवण्यासाठी नाही, तर त्यांना उत्साही, तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी असतं. त्यामुळे त्यांच्या आहारात काही अत्याधुनिक घटकांचाही समावेश केला जातो, जसे की प्रयोगशाळेत तयार केलेले मांस, सूक्ष्म शैवालावर आधारित अन्न, सुपरफूड आणि अलीकडे तर ‘वाइन गोळ्या’ देखील. हे सर्व त्यांना पौष्टिकता आणि चव एकाच वेळी देण्यासाठी असतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!