नखं ही केवळ सौंदर्याची बाब नसून ती शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा आरसासुद्धा असतात. जर तुमच्या नखांवर रेषा, पट्टे किंवा रंग बदल दिसू लागले, तर ते दुर्लक्षित करू नका. या बदलांमागे काही विशिष्ट पोषक घटकांची कमतरता किंवा आरोग्याशी संबंधित गंभीर कारणं असू शकतात.

जर तुमच्या नखांवर उभ्या रेषा म्हणजेच सरळ, सूक्ष्म किंवा स्पष्ट दिसणाऱ्या रेषा आढळत असतील, तर त्या बहुधा वय वाढल्याने होणारा बदल असू शकतो. वाढत्या वयानुसार नखांचे पोषण थोडं कमी होतं, ज्यामुळे अशा रेषा तयार होतात. या रेषा जर हलक्या असतील आणि नखं तुटत नसतील, तर त्याची फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जर रेषा खूप खोल, उठावदार आणि सोबत नखं तुटणं, रंग बदलणं, किंवा नखांची कड झिजणं दिसत असेल, तर ही स्थिती आरोग्याबाबत गंभीर इशारा देणारी ठरू शकते.
‘या’ रेषाकडे दुर्लक्ष करू नका
नखांवर पांढऱ्या रेषा दिसत असतील, तर त्याला वैद्यकीय भाषेत Leukonychia Striata असं म्हणतात. हे मायक्रोट्रॉमा, बुरशीजन्य संसर्ग किंवा काही आनुवंशिक आजारांमुळे देखील होतं. जर रेषा सतत वाढत असतील आणि नवीन नखांमध्येही दिसत असतील, तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
काही वेळा नखांवर काळ्या किंवा तपकिरी रेषाही आढळतात. याला Melanonychia असं म्हणतात. या रेषा शरीरातील झिंक, व्हिटॅमिन सी, आणि इतर अँटीऑक्सिडंट्सच्या कमतरतेमुळे होतात. ही रेषा अनेक वेळा औषधांचे साइड इफेक्ट, कोणताही आघात किंवा संसर्गामुळे येतात. मात्र जर या रेषांमधून रक्तस्त्राव होत असेल, वेदना होत असतील किंवा त्या स्थिर राहून वाढत असतील, तर त्वरीत तपासणी करणे आवश्यक आहे.
कधी कधी नखांवर दिसणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांना Mees’lines म्हणतात. हे लक्षण आर्सेनिकसारख्या धातूच्या विषबाधेचं किंवा मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या गंभीर आरोग्य स्थितीचं सूचक असू शकतं. त्यामुळे नखांतील पांढऱ्या रेषा सौंदर्याचा प्रश्न नसून आरोग्याच्या धोक्याचं संकेत असू शकतात.
उपाय काय?
शरीरात जर पोषक घटकांची कमतरता असेल, तर ती अन्नातून भरून काढणे आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्यं, फळं, सुके मेवे, अंडी, दूध, आणि मांसाहारी अन्न यांचा समावेश करावा. पुरेसे पाणी प्यावे आणि वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घ्यावे.
एकंदरीत सांगायचं झालं, तर नखांवर रेषा दिसणं ही सौंदर्याची समस्या नसून आरोग्याचा संकेत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन मोठ्या त्रासाचं कारण बनू शकतं.