सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण कुठे तरी पोहोचण्याच्या घाईत आहे. कुणाला करिअर गाठायचं आहे, कुणाला समाजात स्वतःचं स्थान मिळवायचं आहे. पण या शर्यतीत आपण नकळत आपलं मानसिक आरोग्य, आपली शांती गमावतो. आणि मग जेव्हा मन थकलेलं असतं, तेव्हा शरीरही थकून जातं. अशावेळी कुठेतरी दूर, निसर्गाच्या कुशीत जाऊन स्वतःला पुन्हा सावरायची गरज असते. भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जी केवळ सौंदर्याने मन मोहवतात असं नाही, तर आपल्या आतल्या तणावालाही शांत करतात, जणू काही तिथे गेल्यावर वेळही क्षणभर थांबतो.
‘तोष’ गाव

हिमाचल प्रदेशातील पार्वती खोऱ्यात वसलेलं ‘तोष’ हे गाव म्हणजे स्वर्गच. या लहानशा गावात पोहोचल्यावर आसपासचा पक्ष्यांचा किलबिलाट, थंड हवेचा स्पर्श, हिरवळीतून वाहणाऱ्या झऱ्यांची गाणी ऐकू येतात. इथल्या शांततेत काही वेळ बसलं, की मनात साठलेली अस्वस्थता आपोआप वितळून जाते.
‘अगाट्टी बेट’
जर तुम्हाला समुद्राच्या कुशीत विसावायचं असेल, तर लक्षद्वीपमधील ‘अगाट्टी बेट’ हे अगदी योग्य ठिकाण आहे. निळ्याशार पाण्यात परावर्तीत होणारा सूर्यकिरणांचा सोनेरी प्रकाश, रंगीबेरंगी मासे, आणि निःशब्द किनाऱ्यावरचा निवांत वेळ हे सगळं पाहून वाटतं की तणाव नावाचं काही अस्तित्वातच नव्हतं कधी.
‘जोखू खोरे’
पूर्व भारतातलं नागालँडचं ‘जोखू खोरे’ हे असंच एक विस्मरणात गेलेलं ठिकाण आहे, जे आता हळूहळू लोकांच्या मनात घर करतंय. जांभळ्या रंगाची ‘जोखू लिली’ ही फुलं इथेच फुलतात, जगात इतर कुठेही नाही. इथे वाहणारी काचेसारखी नदी आणि उंचच उंच डोंगर मनातलं सगळा गोंधळ अलगद वाहून नेतात. तुम्ही नदीकिनारी तंबू टाकून रात्रीच्या शांततेचा अनुभव घेऊ शकता.
‘सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क’
केरळच्या निलगिरी पर्वतरांगांमध्ये वसलेलं ‘सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क’ हे जसं वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्ग आहे, तसंच आतल्या शांततेच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठीही. इथलं हिरवंगार जंगल, पक्ष्यांचे आवाज, आणि ढगांमध्ये लपलेली डोंगररांग सगळंच एखाद्या चित्रासारखं भासतं. एकदा का कोणी इथे गेलं, की मन पुन्हा पुन्हा तिथे परतावं असंच म्हणतं.
‘कुर्ग’
कर्नाटकमधील ‘कुर्ग’ हे हिल स्टेशन म्हणजे सौंदर्य, शांतता आणि सुगंध यांचं मिलनस्थान आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1,525 मीटर उंचीवर वसलेलं हे ठिकाण केवळ सुंदर घाटांमुळे नव्हे, तर इथल्या कॉफी आणि मसाल्यांच्या वासानेही मन प्रसन्न करतं. इथल्या गर्द झाडीतून फिरताना, कुठे तरी मनात न उमटलेली एक विश्रांती जाणवते.
‘त्रिउंड’
हिमाचल प्रदेशातील ‘त्रिउंड’ हे ठिकाण शांततेच्या प्रेमींनी एकदा तरी अनुभवायलाच हवं. कांगडा जिल्ह्यात वसलेलं हे हिल स्टेशन उंच डोंगररांगांमध्ये लपलेलं आहे. इथून दिसणाऱ्या हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचा नजारा पाहताना, मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. गर्दीपासून दूर, निसर्गाच्या जवळ असण्याची ती भावना शब्दांत नाही सांगता येत.