कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही क्षणं येतात जेव्हा वाटतं, नशीबच रुसल्यासारखं आहे. मेहनत करतोय, प्रार्थना करतोय, पण काहीतरी अडथळा येतोच. अशा वेळेला मन निराश होतं आणि दिशाही गहाळ वाटतात. पण आपल्या भारतीय संस्कृतीत, अशा अंधारात प्रकाश दाखवणारे मार्ग आहेत. त्यातलाच एक मार्ग म्हणजे बुधवारी केले जाणारे गणेश पूजन आणि काही खास उपाय. हे उपाय केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून, अनेकांनी अनुभवलेली एक सकारात्मक ऊर्जा आहेत, जी नशिबाचे बंद दरवाजेसुद्धा उघडू शकतात.

विशेष गणेश पूजन
बुधवारचा दिवस हा भगवान गणेशाला समर्पित मानला जातो. गणेशजी बुद्धी, प्रज्ञा आणि यशाचे प्रतीक आहेत. त्यामुळे या दिवशी त्यांची श्रद्धेने केलेली पूजा मनाला स्थैर्य देते आणि आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्याचं बळही मिळतं. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वारंवार अपयश येत असेल, संधी मिळूनही ती हातातून निसटत असेल, तर त्याने बुधवारी विधीपूर्वक गणेश पूजन करावं. विशेष म्हणजे या पूजनात ‘गण गणपतये नमः’ हा मंत्र 108 वेळा उच्चारल्यास, गणेशजींचा आशीर्वाद मिळण्याची शक्यता अधिक असते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
गणेशजींना सिंदूर अर्पण करा
केवळ पूजाच नव्हे तर काही खास कृती देखील आहेत ज्या बुधवारी केल्यास यशाचा मार्ग सुलभ होतो. उदाहरणार्थ, गणेशजींना सिंदूर अर्पण करणे आणि तोच सिंदूर स्वतःच्या कपाळावर लावणे या छोट्याशा कृतीतही एक प्रकारची शक्ती आहे, असं मानलं जातं. यामुळे मनातील भीती दूर होते आणि आपण ज्या कार्यासाठी बाहेर पडतो, त्यात सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा लहानशा गोष्टींचा आपल्या आत्मविश्वासावर खूप मोठा परिणाम होतो.
गणेश चालीसा पठण
याशिवाय, नारद पुराणात नमूद केल्याप्रमाणे, बुधवारी किमान 11 वेळा गणेश चालीसा पठण केल्यास, भगवान गणेश प्रसन्न होतात आणि घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. यामागे धार्मिक भावनांबरोबरच एक आत्मिक समाधान देखील दडलेलं आहे, जे मनाला आश्वस्त करतं की आपण एका योग्य मार्गावर आहोत.
गायीला हिरवा चारा खाऊ घाला
कुंडलीत बुध ग्रह कमजोर असल्यास, जीवनात अनेक अडचणी येतात, विशेषतः करिअर, संवाद आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत. अशावेळी बुधवारी गायीला हिरवे गवत खाऊ घालणं हा एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे बुध ग्रहाचे प्रभाव वाढतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीला स्थैर्य, यश आणि सौख्य मिळायला सुरुवात होते.