जन्माचा महिना आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनशैलीवरही खोल परिणाम करतो, असे अनेकदा म्हटले जाते. त्यात जर एखादी व्यक्ती ऑक्टोबर महिन्यात जन्मलेली असेल, तर तिच्या आयुष्यात भावना, सौंदर्याची आवड, आणि थोडी ‘फाजील खर्चिक’ वृत्ती हे सगळं एकत्र पाहायला मिळतं. हे लोक मनाने प्रेमळ, पण पैशाच्या बाबतीत हात आखडता घेणे फारसे जमत नाही, म्हणून त्यांच्या जीवनात गोड-तुरट अनुभवांचे मिश्रण असते.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्यांचा स्वभाव
ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या सहानुभूतीशील, रोमँटिक आणि सौंदर्यवेड्या असतात. त्यांचं भावविश्व खूप समृद्ध असतं, आणि ते भावनिक गुंतवणूक फार लवकर करतात. त्यामुळेच, जेव्हा ते कोणावर प्रेम करतात किंवा कोणासोबत नातं जोडतात, तेव्हा त्यासाठी काहीही करायला तयार असतात, मग ते त्याच्या खिशावर कितीही परिणाम करणार असो. त्या व्यक्तीच्या हास्यापायी ते स्वतःचं समाधान बाजूला ठेवायला मागेपुढे पाहत नाहीत.
पण याच भावनिकतेमुळे अनेकदा त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो. कारण त्यांचं मन एवढं मोकळं असतं की ते ‘ना’ म्हणायला विसरतात. परिणामी, त्यांच्या आयुष्यात काही वेळा आर्थिक ताण, मनस्ताप आणि धोके येतात.
खर्चिक वृत्ती
ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक खर्चाच्या बाबतीत फारसे विचार करत नाहीत. त्यांना काही आवडलं की ते ते लगेच विकत घेतात. अशा वेळी, बजेट, सेव्हिंग, किंवा भविष्यातील गरज या गोष्टी त्यांच्या डोक्यातही येत नाहीत. त्यांचं जीवनशैलीवर प्रेम असतं. सुटसुटीत कपडे, आकर्षक गॅजेट्स, दर्जेदार रेस्टॉरंट्स आणि प्रवास हे सगळं त्यांना मोहवून टाकतं. त्यामुळे ते कितीही कमवत असले, तरी महिन्याअखेरीस त्यांचं खातं अनेकदा रिकामं दिसतं.
मात्र याच वेळी, ते मनाने अत्यंत प्रामाणिक असतात. खोटं बोलणं किंवा ऐकणं त्यांना सहन होत नाही. कोणतीही गोष्ट त्यांना स्पष्ट आणि पारदर्शक हवी असते. जर कोणी त्यांच्या भावनांशी खेळ करत असेल, तर ते त्या नात्याला दूर सारतात, कारण त्यांच्या आयुष्यात खोटेपणा चालत नाही.
खोटेपणा कदापी सहन करत नाहीत
हे लोक आयुष्यात सौंदर्य, प्रेम आणि सच्चेपणा या तीन गोष्टींना प्राधान्य देतात. ते आपली भावना शब्दांत व्यक्त करायला उघडपणे तयार असतात आणि हेच त्यांना लोकांमध्ये लोकप्रिय बनवतं. त्यांच्या उत्साही, पण कधीमधी अस्थिर आर्थिक स्वभावामुळे त्यांना थोडं आर्थिक नियोजन शिकायला हवं, हे मात्र नक्की.