झुरळ… आपल्यापैकी अनेकांना याचे नाव ऐकूनच अंगावर काटा येतो. स्वयंपाकघरात अचानक डोकावणारे, पाहता क्षणी पळवाट शोधणारे हे लहानसे पण चिवट जीव खरोखरच जगातील एक अद्भुत रहस्य आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, झुरळाला जर डोके कापले तरी ते आठवडाभर जिवंत राहू शकते? हे ऐकून कोणालाही धक्का बसेल, पण विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिल्यास यामागील कारणं अत्यंत रंजक आणि थक्क करणारी आहेत.

झुरळाची रचना
साध्या नजरेत दिसणाऱ्या झुरळाच्या शरीरात काही तरी भन्नाट अशी रचना आहे. त्यांचं शरीर माणसांसारखं संपूर्ण मेंदूवर अवलंबून नसतं. उलटपक्षी, त्यांचा मेंदू एका विशिष्ट ठिकाणी न राहता त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरलेला असतो.
त्यामुळेच डोके नसतानाही त्यांचं शरीर अनेक मूलभूत कामकाज चालू ठेवू शकतं. विशेष म्हणजे, झुरळांना श्वास घेण्यासाठी आपल्यासारखं नाक लागत नाही. त्यांच्या शरीरावर असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांमधून ते श्वास घेतात. म्हणूनच डोके कापलं तरीही ते श्वास घेणं थांबत नाही.
अजून एक खास गोष्ट म्हणजे झुरळाचं रक्त माणसांप्रमाणे नसतं. त्यांच्यात ‘ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम’ असते, ज्यात रक्त शरीरभर संथपणे वाहत असतं. डोके कापल्यावर रक्ताचा झपाट्याने होणारा अपसर्ग होत नाही, त्यामुळे शरीरात रक्तस्राव फारसा न होता जखम लवकर भरून येते आणि झुरळ जिवंत राहू शकतं.
झुरळाची वेग क्षमता
झुरळाचं टिकाऊपण यावरच संपत नाही. डोके नसताना ते खाणं-पिणं शक्य नसल्यामुळे उपाशी राहावं लागतं. पण तरीही ते जवळपास एक महिना खाल्ल्याशिवाय जगू शकतं. मात्र पाण्याशिवाय त्यांचं आयुष्य फार टिकत नाही. साधारणपणे 7 ते 9 दिवसांत ते निर्जलतेमुळे मरतं.
या लहानशा जीवामध्ये आणखी एक अजब क्षमता आहे, श्वास रोखण्याची. झुरळ जवळपास 40 मिनिटं श्वास न घेता जगू शकतं आणि 30 मिनिटं पाण्यात राहूनही ते जिवंत राहतं. इतकंच नव्हे तर हे छोटंसं प्राणी 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावू शकतं, जे त्याच्या आकारमानाच्या तुलनेत खूपच प्रभावी आहे.