कल्पना करा, तुमचं संपूर्ण देशावरचं प्रेम, तुमचं बालपण, घर, आठवणी, निसर्ग सगळं काही मागं सोडून तुम्हाला दुसऱ्या देशात स्थलांतर करावं लागतंय… आणि तेही हवामान बदलामुळे! हे कोणतं भयपटाचं कथानक नाही, तर तुवालु या छोट्याशा देशाची उदासवाणी सत्यकथा आहे, जिथे समुद्र एकेक पाऊल पुढं येतो आहे आणि संपूर्ण राष्ट्रच नकाशावरून नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे.
तुवालु देशाचे भयंक वास्तव
दक्षिण पॅसिफिकमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि हवाई यांच्या दरम्यान असलेलं तुवालु हे नऊ छोट्या प्रवाळ बेटांनी बनलेलं राष्ट्र, सध्या जगातील हवामान बदलाच्या सर्वात भयंकर परिणामांचा सामना करतंय. समुद्रसपाटीपासून केवळ काही फुटांवर असलेल्या या बेटांवर पाणी दिवसेंदिवस चढतंय, इतकं की 2050 पर्यंत हे सगळं पाणीखाली जाईल, असा अंदाज आहे. आणि म्हणूनच, तुवालुच्या नागरिकांनी जिथे जन्म घेतला, वाढले, स्वप्नं पाहिली ती भूमीच आता कायमची मागं पडणार आहे.

या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन सरकार आणि तुवालु यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला आहे. याअंतर्गत, 2025 पासून दरवर्षी 280 तुवालु रहिवाशांना विशेष व्हिसाद्वारे ऑस्ट्रेलियात स्थलांतराची संधी मिळणार आहे. ही जगातील पहिली अशी “हवामान स्थलांतर व्हिसा” योजना आहे, जी हवामान बदलामुळे होणाऱ्या विस्थापनासाठी आधीच तयार करण्यात आली आहे.
“हवामान स्थलांतर व्हिसा” योजना
या व्हिसासाठी 16 जून रोजी अर्ज सुरू झाले आणि 18 जुलैपर्यंत थोडक्याच काळात 5,157 नागरिकांनी अर्ज केले. विशेष म्हणजे, पहिल्या चारच दिवसांत 3,125 लोकांनी नोंदणी केली, म्हणजे देशाच्या सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येनं. ही आकडेवारी स्वतःच खूप काही सांगून जाते, की लोकांना तिथं राहणं अशक्य होत चाललंय.
या स्थलांतर प्रक्रियेचा एक वेगळाच भावनिक आणि सामाजिक अर्थ आहे. ही स्थलांतराची गरज कुठल्या युद्धामुळे किंवा आर्थिक कारणांमुळे नाही, तर निसर्गाच्या कोपामुळे आहे. तुवालुतील लोक आपली ओळख, आपली भाषा, आपली संस्कृती आणि इतिहास सोबत घेऊन परक्या देशात नव्याने सुरुवात करणार आहेत.
दरवर्षी 4% लोक तुवालु सोडतील
तुवालुचा सर्वोच्च भूभाग समुद्रसपाटीपासून फक्त 15 फूट उंच आहे, तर बहुतांश जमिनी फक्त 6 फूटांवर आहेत. यामुळे समुद्रात थोडीसुद्धा वाढ झाली तरी पूर, वादळ आणि लाटांचा फटका थेट जनजीवनावर पडतो. गोड्या पाण्याचे साठे देखील आता समुद्री पाण्याने झिरपू लागले आहेत. परिणामी, पिण्याचं पाणीही धोक्यात आलं आहे.
न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील प्राध्यापक जेन मॅकअॅडम यांच्या मते, या नवीन व्हिसामुळे पुढील काही वर्षांत देशातील लोकसंखेचा मोठा भाग हळूहळू स्थलांतरित होईल. दरवर्षी 4% लोक तुवालु सोडतील, आणि 10 वर्षांत हा आकडा 40% पर्यंत पोहोचू शकतो.तुवालुची ही अवस्था संपूर्ण जगासाठी एक चेतावणी आहे. हवामान बदल ही केवळ एक पर्यावरणीय समस्या नाही, तर ती मानवी अस्तित्वावरचा गंभीर प्रश्न आहे.