भारतात हिवाळ्याच्या थंड संध्याकाळी अनेक ठिकाणी ओल्ड मंक ही देसी रम घेतली जाते. ही केवळ एक रम नाही, तर अनेकांसाठी आठवणी, भावनांचा आणि आपुलकीच्या क्षणांचा भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या रमच्या बाटलीवर जो चेहरा छापलेला असतो, तो कोणाचा आहे? त्यामागची खरी कहाणी थक्क करणारी आहे.

‘ओल्ड मंक’चा इतिहास
ही रम केवळ एक पेय म्हणून उदयास आलेली नाही, तर तिच्या पाठीमागे आहे एका भारतीय सैनिकाची दूरदृष्टी. वर्ष होते 1954. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि मानसिकता दोन्ही परिवर्तनाच्या उंबरठ्यावर होत्या. त्याच काळात, भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले कर्नल वेद रतन मोहन यांनी मोहन मीकिन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ओल्ड मंक रम भारतात सुरू केली. त्यांच्या दृष्टीने हा केवळ व्यवसाय नव्हता, तर एक असा ब्रँड उभारायचा होता, जो देशी अभिमान आणि आंतरराष्ट्रीय दर्जा यांचा संगम असेल.
ओल्ड मंकमध्ये 42.8% अल्कोहोल असते आणि तरीही ती एक सौम्य, सहज पचणारी रम मानली जाते. हिवाळ्यात विशेषतः ती शरीरात उब निर्माण करत असल्यामुळे ती अधिक लोकप्रिय ठरते. पण या रमच्या यशामागे एक खास गोष्ट आहे. तिच्या बाटलीवर छापलेले चित्र. ते कुण्या ब्रँड अँबॅसिडरचे नाही, ना कुठल्या जाहिरातीतल्या चेहऱ्याचे. ही प्रतिमा आहे बेनेडिक्टाइन संताची.
कोण होते बेनेडिक्टाइन?
हा संत एक युरोपियन मठवासी होता, ज्याचे जीवन संयम, साधना आणि आत्मिक साधनेसाठी ओळखले जाते. कर्नल मोहन यांनी हा चेहरा निवडण्यामागे एक खास विचार होता. रम हा पेय असला, तरी त्यातही एकप्रकारची साधेपणा, एक सुसंस्कृत शैली असावी, हे त्यांनी या प्रतिमेद्वारे अधोरेखित केले.
आज जरी ओल्ड मंक देशभरात आणि परदेशातसुद्धा प्रसिद्ध असली, तरी ती आपल्याकडे नेहमी “देसी रम” म्हणूनच ओळखली जाते. कारण तिच्या मुळाशी आहे भारतीय सैनिकाचा आत्मविश्वास, देशप्रेम आणि आपल्या उत्पादनावर असलेला अभिमान.