जयपूरने पुन्हा एकदा भारताचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं आहे. ट्रॅव्हल अँड लीजरच्या 2025 च्या अहवालात ‘पिंक सिटी’ जयपूरने जगातील 5व्या सर्वात सुंदर शहराचा सन्मान पटकावला आहे. एकीकडे भारताच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत असतानाच, दुसरीकडे जागतिक स्तरावरही आपलं अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या जयपूरने फ्लोरेन्ससारख्या प्रसिद्ध युरोपीय शहरालाही मागे टाकलं आहे.

युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या जयपूर शहरात गुलाबी रंगातील भव्य इमारती, ऐतिहासिक किल्ले आणि लोककलेने नटलेले बाजार पर्यटकांच्या मनात घर करून राहतात. अंबर किल्ला, हवा महल, सिटी पॅलेस, जल महल आणि जंतर मंतर ही ठिकाणं एकाच वेळी इतिहास, वास्तुशास्त्र आणि स्थापत्यकलेचं अप्रतिम दर्शन घडवतात.
जयपूरमधील खास ठिकाणं
जयपूरमधील हवा महल हा गुलाबी दगडात कोरलेला सौंदर्याचा नमुना आहे. अंबर पॅलेस टेकडीवर उभारलेला असून त्याचं सौंदर्य आश्चर्यचकित करतं. सिटी पॅलेसमध्ये शाही भव्यतेचा अनुभव घेता येतो, तर जंतर मंतर या प्राचीन वेधशाळेमुळे विज्ञानप्रेमींनाही आकर्षण वाटतं. जल महाल हे जलाशयाच्या मध्यभागी वसलेला अद्भुत राजवाडा आहे, ज्याचं सौंदर्य संध्याकाळच्या वेळेस आणखीन खुलून दिसतं.
जयपूर केवळ सौंदर्य आणि इतिहासापुरतंच मर्यादित नाही, तर येथे मिळणाऱ्या खास खाद्यपदार्थांनीही लोकांचं मन जिंकलं आहे. दाल बाटी चुरमा, गट्टे की सब्जी, केर सांगरी आणि लाल मास ही राजस्थानची पारंपरिक पक्वान्नं तुमच्या चवीलाही एक खास अनुभव देतात. तसेच जोहरी बाजार आणि बापू बाजारसारख्या बाजारपेठा रंगीबेरंगी कपडे, पारंपरिक दागिने आणि हस्तकलेच्या वस्तूंनी भरलेल्या असतात.
जयपूर कसे पोहोचाल?
जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर भारतातल्या आणि परदेशातल्या अनेक शहरांतून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांतून रेल्वेगाड्या चालतात. तसेच दिल्ली-जयपूर महामार्गामुळे कारने प्रवास करणंही अतिशय सोयीचं आणि आरामदायक ठरतं.
कधी भेट द्यावी?
जयपूरची सफर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत अधिक सुंदर ठरते. थंडीचा हंगाम येथील हवामान आल्हाददायक करत असून, फेस्टिवल्स आणि बाजारपेठांमधील रंगही जास्त खुलतो. यावेळी तुम्हाला राजस्थानच्या सांस्कृतिक रंगांची अनुभूती अधिक प्रभावीपणे मिळते.
जयपूरमधील आलिशान हेरिटेज हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स तुमच्या प्रवासाला राजेशाही स्पर्श देतात. हवेलीपासून ते राजवाड्यांमध्ये रूपांतरित केलेल्या हॉटेल्सपर्यंत इथे प्रत्येक ठिकाण तुमच्या आठवणीत कोरलं जाईल.