आज जगभरात पोलिस दल आणि प्रशासकीय पदे अस्तित्वात असली तरी यांचा उगम नेमका कुठे झाला, यावर अनेकांचे वेगवेगळे मत असते. बहुतांश लोक मानतात की आधुनिक पोलिस व्यवस्था युरोपात उदयाला आली. मात्र सत्य हे आहे की भारतात सुमारे 2300 वर्षांपूर्वीच एका दूरदृष्टी असलेल्या सम्राटाने हे सर्व घडवून आणले होते. तो राजा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य.

चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील व्यवस्था
चंद्रगुप्त मौर्य हे फक्त साम्राज्यवादी राजा नव्हते, तर एक कुशल प्रशासक देखील होते. त्यांनी आपल्या विशाल साम्राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस दल स्थापन केले होते. हे दल “रक्षित” या नावाने ओळखले जाई. फक्त पोलिसच नाही, तर त्यांनी जिल्हा आणि शहरी प्रशासनासाठीही स्वतंत्र पदे निर्माण केली होती यांना आज आपण “जिल्हा दंडाधिकारी” आणि “शहर आयुक्त” म्हणतो. ग्रीक इतिहासकारांनी देखील या व्यवस्थेचे कौतुक करत त्यांच्या लेखनात या अअधिकाऱ्यांना अनुक्रमे Agronomoi आणि Antinomoi अशी संज्ञा दिली आहे.
ग्रीक इतिहासकार प्लिनीने लिहिले आहे की चंद्रगुप्ताच्या सैन्यात तब्बल 6,00,000 पायदळ सैनिक, 30,000 घोडेस्वार आणि 9,000 हत्ती होते. इतकेच नव्हे तर त्यांची राजधानी पाटलीपुत्र ही अतिशय भव्य आणि विकसित शहर होती. याचा उल्लेख अनेक ग्रीक कागदपत्रांमध्ये आढळतो.
चंद्रगुप्त मौर्य यांचे साम्राज्य
सुमारे इ.स.पूर्व 320 मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी आचार्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली. ते भारताच्या इतिहासातील पहिले सम्राट होते ज्यांनी एकात्म भारत घडवण्याचे ध्येय साध्य केले. त्यांच्या साम्राज्याची सीमा आजच्या अफगाणिस्तान आणि इराणपासून ते तिबेट, म्यानमार, थायलंड, श्रीलंका आणि इंडोनेशिया पर्यंत पसरली होती.
अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती सेल्युकसने भारतावर आक्रमण केले होते, परंतु चंद्रगुप्ताने त्याला आपल्या भव्य सैन्याच्या साहाय्याने पराभूत केले. त्यानंतर दोघांमध्ये तह होऊन सेल्युकसने आपली मुलगी चंद्रगुप्ताशी विवाहासाठी दिली आणि भारतातील बरीच भूमी त्याच्या हवाली केली.
चंद्रगुप्त मौर्य हे केवळ सामर्थ्यवान सम्राटच नव्हते तर त्यांनी एक नियोजित, सुसंस्कृत आणि अनुशासित प्रशासन निर्माण केले. आधुनिक भारतात जे पोलीस, जिल्हाधिकारी, आयुक्त पदे आहेत, त्यांची बीजे अगदी त्या काळातच पेरली गेली होती.