‘ही’ आहे इतिहासातील सर्वात महागडी आणि अत्यंत पवित्र जमीन, यामागचा इतिहास वाचून हृदय पिळवटून निघेल!

Published on -

जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जमीन सोन्याच्या किमतीला विकली जाते. पण पंजाबमधील फतेहगढ साहिब येथे असलेली एक जागा केवळ पैशांनी नाही, तर त्याग, भक्ती आणि अपरंपार श्रद्धेने मोजली गेली आहे. इथेच गुरु गोविंद सिंह यांचे लहान साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंह आणि माता गुजरी यांचे अंत्यसंस्कार झाले. या भूमीचा इतिहास केवळ धार्मिक नाही, तर मानवी मूल्यांचा सर्वोच्च शिखर गाठणारा आहे.

दिवाण तोडरमल यांचा अमर त्याग

मुघल साम्राज्याच्या काळात, सरहिंदचा नवाब वजीर खान याने शेवटपर्यंत मुसलमान होण्यासाठी दबाव टाकल्यानंतर, लहान साहिबजाद्यांना थंडे बुर्जमध्ये तीन दिवस ठेवण्यात आले आणि अखेर भिंतीमध्ये जिवंत गाडले गेले. माता गुजरी यांचेही हृदयविदारक निधन झाले. या अमानुष घटनेनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नव्हतं. कारण मुघल नवाबाने अंत्यसंस्कारासाठी जमीन देण्याच्या बदल्यात अबाधित सशर्त किंमत ठेवली होती. 78 ,000 सोन्याची नाणी आणि तीही जमीन पायाने न तुडवता मोजली जावी, म्हणजे नाणी टाकत टाकत चालावं लागेल.

अशा भीषण वेळी पुढे आले दिवाण तोडरमल. ते जैन धर्मीय होते, पण गुरू घराण्याबद्दल अपार श्रद्धा आणि निष्ठा होती. त्यांनी आपली संपत्ती विकून, हजारो सोन्याची नाणी गोळा केली आणि ती नाणी जमिनीवर टाकत चालत गेले. कारण अट अशी होती की जमीन केवळ नाण्यांवरून चालून मोजली जावी. त्यांना शेवटी काही यार्ड जमीन मिळाली आणि त्यांनी त्या पवित्र जागेवर साहिबजाद्यांचा आणि माता गुजरी यांचा अंत्यसंस्कार केला.

 

गुरुद्वारा ज्योति स्वरूप साहिब

आज जिथे हा अंत्यसंस्कार झाला, तिथं उभारण्यात आले आहे गुरुद्वारा श्री ज्योति स्वरूप साहिब. त्याच्या तळघराला दिवाण तोडरमल जैन हॉल म्हणतात. फतेहगढ साहिबमध्ये अजूनही त्यांची जुनी हवेली ‘जहाज हवेली’ उभी आहे, जिला आज पंजाब सरकारने ऐतिहासिक स्मारक म्हणून जपून ठेवलं आहे.

इतिहासात असा प्रसंग विरळच. इतक्या मोठ्या श्रद्धेने, केवळ चार यार्ड जमिनीसाठी 78 ,000 सोन्याची नाणी देणं केवळ आर्थिक नव्हे, तर आध्यात्मिक आणि मानवी दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे. जेव्हा गुरु गोविंदसिंहजींनी दिवाण तोडरमल यांना काही मागण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी फक्त एवढं मागितलं की त्यांच्या कुळात पुन्हा कोणी मुलगा होऊ नये, जेणेकरून भविष्यात ही जमीन कोणीही आपल्या नावावर घेण्याचा दावा करणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!