‘ही’ आहे भारतातील सर्वात जुनी बाजारपेठ, मुघल बादशाह शाहजहानने मुलीच्या शौकासाठी केली होती उभारणी!

Published on -

दिल्लीच्या गर्दीच्या रस्त्यांवर, आजही एक ठिकाण आहे जे काळाच्या पटलावर कायमचं कोरलं गेलं आहे, ते म्हणजे चांदणी चौक. गर्दी, गोंगाट, खरेदीचा उत्साह आणि खाद्यपदार्थांचा सुगंध या साऱ्यांनी भरलेल्या या बाजारपेठेचं वैशिष्ट्य इतकंच नाही की ती दिल्लीतील सर्वांत गजबजलेली बाजारपेठ आहे, तर तिच्या उगमामागे एक हळवं, काळजाला भिडणारं प्रेमाचं कारण आहे, एका बापाचं आपल्या मुलीवर असलेलं प्रेम.

दिल्लीतील ‘चांदणी चौक’ बाजार

मुघल सम्राट शाहजहान म्हणजे एक असा राजा ज्याने ताजमहालसारखा अमर प्रेमाचा स्मारक उभा केला. पण केवळ पत्नी मुमताज महलसाठीच नाही, तर आपल्या मुलीवरही त्याचं प्रेम इतकंच गहिरं होतं. त्याची मुलगी जहांआरा बेगम सौंदर्य, बुध्दी आणि करुणा यांचा संगम होती. तिला खरेदीची विशेष आवड होती. शहरभरातील बाजारपेठांमध्ये जाऊन ती वेगवेगळ्या गोष्टी निवडायची, परंतु त्यात वेळ आणि श्रम फारसे वाया जायचे. हे शाहजहानला समजल्यावर त्याने निर्णय घेतला. एक अशी भव्य, एकत्रित आणि सुंदर बाजारपेठ तयार करायची, जिथे त्याच्या प्रिय कन्येला हव्या त्या सर्व वस्तू एका ठिकाणी सहज मिळू शकतील.

याच विचारातून 1650 साली जन्म झाला चांदणी चौकचा. आज जिथे लाखो लोक दररोज खरेदीसाठी गर्दी करतात, त्या रस्त्यांवर तब्बल 370 वर्षांपूर्वी शाहजहानने आपल्या प्रेमाची आणि मुलीच्या स्वातंत्र्याची पायाभरणी केली होती. जहांआराच्या देखरेखीखाली तयार झालेली ही बाजारपेठ केवळ व्यवसायिक स्थळ नव्हती, ती त्या काळातल्या सांस्कृतिक जीवनाचं, स्त्री स्वातंत्र्याचं आणि सौंदर्यदृष्टीचं प्रतीक बनली होती.

चांदणी चौकची वैशिष्ट्ये

काळ बदलला, सत्ता बदलल्या, परंतु चांदणी चौकचा जिवंतपणा तसाच राहिला. आजही या बाजारात स्वस्त कपड्यांपासून महागड्या दागिन्यांपर्यंत, स्वादिष्ट स्ट्रीट फूडपासून पारंपरिक वस्तूंपर्यंत सगळं काही मिळतं. पर्यटकांसाठी हा केवळ खरेदीचा नव्हे, तर इतिहासाशी जोडलेला अनुभव असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे चालणारी वर्दळ, लोकांचा उत्साह आणि सदैव गजबजलेलं वातावरण या ठिकाणाचं खास वैशिष्ट्य आहे.

चांदणी चौक फक्त एक बाजार नव्हे, तर दिल्लीच्या काळजाचं ठिकाण आहे.जिथे इतिहास आणि वर्तमान हातात हात घालून चालतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!