वरुण धवनच्या ‘बॉर्डर 2’ या बहुचर्चित चित्रपटात एक नवे नाव झळकणार आहे, मेधा राणा. ही नवोदित अभिनेत्री सध्या चर्चेत आहे कारण टी-सीरीजने तिची मुख्य अभिनेत्री म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. बॉर्डर 2 मध्ये ती एकमेव प्रमुख महिला कलाकार म्हणून झळकणार असून तिची उपस्थिती चित्रपटाला एक नवसंजीवनी देईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. पण मेधा राणा नेमकी कोण आहे, तिचा अभिनय प्रवास आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याचा लष्करी पार्श्वभूमीशी काय संबंध आहे, हे जाणून घेणे तितकेच रोचक आहे.

कोण आहे मेधा राणा?
मेधा राणाने केवळ 16 व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र तिची निवड वयाच्या केवळ 13 व्या वर्षीच झाली होती. बेंगळुरूमध्ये प्रसिद्ध फॅशन स्टायलिस्ट आणि कोरिओग्राफर प्रसाद बिदापा यांनी तिच्यातील चमक पाहिली आणि तिला निवडलं. त्यानंतर तिच्या करिअरने वेग घेतला आणि तिने मागे वळून पाहिलं नाही.
मेधा राणा ही मूळची चंदीगडची असून तिचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. वडिलांच्या पोस्टिंगमुळे संपूर्ण कुटुंब बेंगळुरूमध्ये स्थायिक झालं. इथेच मेधाने तिच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेतले. क्राइस्ट विद्यापीठातून तिने फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये BBA पदवी प्राप्त केली आहे.
मेधा राणाचा करिअर प्रवास
मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना तिने पॉन्ड्स, ट्रेसेमे, कॅडबरी, लिव्हॉन, लेन्सकार्ट आणि नेस्केफे यांसारख्या नामांकित ब्रँडसाठी काम केलं. इतकंच नव्हे, तर प्रसिद्ध गायक अरमान मलिकच्या ‘बरसात’ या म्युझिक व्हिडिओमध्येही ती झळकली आहे.
अभिनयाच्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी मेधाने OTT प्लॅटफॉर्मवर आपली तयारी सुरू केली होती. Netflix वरील ‘Friday Night Plans’ मध्ये बाबिल खानसोबत तिची भूमिका प्रेक्षकांना भावली. त्याचप्रमाणे ‘London Files’ या Voot इंडियाच्या सिरीजमध्येही ती अर्जुन रामपाल आणि पूरब कोहलीसोबत झळकली होती.
बॉर्डर 2 ठरणार टर्निंग पॉइंट?
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट मेधासाठी मोठा संधीचा क्षण असू शकतो. वरुण धवन, सनी देओल आणि दिलजीत दोसांझ यांच्यासारख्या कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली आहे. 1997 च्या जे.पी. दत्ताच्या बॉर्डर या कल्ट क्लासिकला पुढे नेणाऱ्या या सिक्वेलमुळे तिचं बॉलिवूडमध्ये पदार्पण भक्कम होईल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.