‘या’ पेट्रोल पंप ट्रिकमुळे दररोज होतेय तुमची लूट! कशी ओळखाल ही चलाख युक्ती?, जाणून घ्या

Published on -

पेट्रोल पंपावर फसवणूक होणं हे काही नवीन नाही. पण तरीही आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतो. विशेषतः एक अशी चूक जी बऱ्याच जणांना साधी वाटते, पण खूप महागात पडू शकते. पेट्रोल भरताना आपण केवळ ‘0’कडे पाहतो आणि बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. हीच बाब काही पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना फसवणुकीचं आयत्यावेळी मिळालेलं साधन बनते.

‘जंप ट्रिक’ नेमकं काय?

पेट्रोल भरायला गेल्यावर आपण मशीनकडे पाहतो आणि शून्य झालंय ना, याची खात्री करतो. पण प्रत्यक्षात याच बिंदूपासून फसवणुकीचा खेळ सुरू होतो. फक्त शून्यावर नजर ठेवणं पुरेसं नसतं. कारण, काही पेट्रोल पंपांवर ‘जंप ट्रिक’ नावाची युक्ती वापरली जाते, ज्यामध्ये मशीन शून्यावरून थेट 5 रुपये, 10 रुपये किंवा अधिकवर उडी घेते आणि मधले 1, 2, 3, 4 रुपयांचे संकेत डिस्प्लेवर दिसतच नाहीत. ही छोटीशी उडी ग्राहकाच्या लक्षातही येत नाही, पण तीच उडी तुमचं पेट्रोल काही मिलीने का होईना, पण कमी करते.

आता तुम्ही म्हणाल, 3-4 रुपयांचं पेट्रोल कमी दिलं तर काय बिघडतं? पण याच छोट्या युक्त्यांचा वापर दररोज शेकडो ग्राहकांवर केला जातो. यामुळे एकाच दिवसात हजारो रुपयांची फसवणूक होऊ शकते. ग्राहकाला पूर्ण रक्कम भरावी लागते, पण त्याला थोडं कमी पेट्रोल मिळतं आणि हीच अघोषित लूट आहे.

फसवणुकीपासून कसं वाचाल?

या फसवणुकीपासून वाचायचं असेल, तर काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. पेट्रोल भरणं सुरू होताच प्रत्येक रुपयाची वाढ व्यवस्थित पाहा. म्हणजे स्क्रीनवर 1, 2, 3… असा सलग आकड्यांचा प्रवास होतोय का, हे तपासा. जर आकडे एकामागोमाग न वाढता थेट उडी घेत असतील, तर ते संशयास्पद आहे. अशा वेळी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना शांतपणे विचारणा करा आणि गरज पडल्यास मोबाईलमध्ये व्हिडिओ करून ठेवा.

तुमची फसवणूक झाली आहे असं वाटल्यास ताबडतोब बिल मागा. बिल न दिल्यास किंवा पंपावर असहकार्य आढळल्यास थेट 1800-2333-555 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल करा. या तक्रारींचं गांभीर्याने परीक्षण केलं जातं आणि जर पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड किंवा हेतुपुरस्सर चुकीचं वागणं आढळलं, तर त्या पंपाचा परवाना रद्द होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!