रोजच्या जेवणात आपण नेहमीच आरोग्यदायी पर्याय शोधत असतो. यामध्ये मूग डाळ हा असा घटक आहे, जो स्वाद, पोषण आणि आरोग्य या सगळ्याच गोष्टींचं एकत्रित उत्तर आहे. साधी दिसणारी ही डाळ आरोग्यासाठी एक वरदानच आहे. खास म्हणजे, ती प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि तिच्या नियमित सेवनाने आरोग्यावर होणारा परिणाम खरंच उल्लेखनीय असतो.

मुग डाळीचे फायदे
ती केवळ चविष्ट नसून, खूपच हलकी आणि पचायला सोपी असते. तिच्या गुणधर्मांमुळे आयुर्वेदात तिला ‘त्रिदोषशामक’ म्हणजे वात, पित्त आणि कफ संतुलित करणारी मानले जाते. त्यामुळेच ती लहानांपासून वृद्धांपर्यंत, अगदी आजारी व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरते. मूग डाळ नियमित आहारात समाविष्ट केल्यास अनेक पचनाशी संबंधित तक्रारी, जसे की बद्धकोष्ठता, अपचन, गॅस किंवा ऍसिडिटी, आपोआप कमी होतात.
या डाळीतील प्रथिने आणि फायबर शरीरासाठी दीर्घकालीन ऊर्जा पुरवतात. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींकरिता मूग डाळीचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स हा एक वरदान ठरतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यासोबतच ती कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही ही डाळ उपयुक्त ठरते, कारण ती पोट भरल्यासारखी भावना देते आणि सतत भूक लागत नाही.
वैज्ञानिकदृष्ट्याही तिचे फायदे सिद्ध झाले आहेत. एका अभ्यासात असे आढळले की मूग डाळीमध्ये ‘अँजिओटेन्सिन’ नावाचे एंजाइम असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवते. तसेच तिच्यातील ट्रिप्सिन पचन सुधारते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि त्वचा उजळवण्यासाठीही मूग डाळ प्रभावी आहे. आयुर्वेदानुसार ती रक्त शुद्ध करते, हाडे मजबूत करते आणि गर्भवती महिलांसाठी तर फॉलिक अॅसिडचा चांगला स्रोत आहे. त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी मूग डाळीपासून फेस पॅक तयार केला जातो, तर केसांसाठीही ती फायदेशीर आहे.
‘अशा’ प्रकारे करा सेवन
मूग डाळीचं सेवन विविध प्रकारे करता येतं. अंकुरलेली मूग डाळ सर्वात पौष्टिक मानली जाते. त्यात नैसर्गिक प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. मूग खिचडी ही एक अतिशय पचायला हलकी आणि अन्नपचनासाठी उपयुक्त डिश आहे, जी आजारी किंवा अशक्त लोकांसाठी खास केली जाते. सूप, दलिया, उसळ किंवा भिजवलेली मूग डाळ या सर्व प्रकारात तिला सहजपणे आहारात सामावून घेता येते. मात्र, एखाद्या गोष्टीचे फायदे जसे असतात, तसे तोटेही असतात. मूग डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना गॅसचा त्रास होऊ शकतो, म्हणून ती प्रमाणात खाणे केव्हाही चांगले.