जसे वय वाढत जाते, तसे आपले शरीरही बदलते. रक्तदाब हा त्यातील एक गंभीर मुद्दा ठरतो. पण, एका साध्या नैसर्गिक उपायाने बीटरूट ज्यूसने उच्च रक्तदाबावर मात करता येते, असा आशादायक शोध आता समोर आला आहे. आजारपणांपासून दूर राहण्यासाठी आपण रोज अनेक गोष्टी करतो, पण बीटरूटचा रस केवळ आरोग्य टिकवून ठेवत नाही, तर वृद्धांमध्ये वाढत्या रक्तदाबाला नियंत्रित करण्याचीही ताकद ठेवतो.

बीटरूट ज्यूसचे फायदे
यूकेमधील एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये असे स्पष्ट झाले आहे की, बीटरूट ज्यूस वृद्ध वयोगटातील लोकांमध्ये उच्च रक्तदाब कमी करण्यात उपयुक्त ठरतो. संशोधकांच्या मते, या रसामुळे तोंडातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियामध्ये बदल होतो, जो पुढे शरीरासाठी आवश्यक असलेल्या नायट्रिक ऑक्साईडच्या निर्मितीत मदत करतो. हे नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवून रक्तदाब सुरळीत राखते.
या अभ्यासात 30 वर्षांखालील 39 तरुण आणि 60-70 वर्षे वयोगटातील 36 वृद्धांचा समावेश होता. या लोकांनी दोन आठवड्यांसाठी नायट्रेटयुक्त बीटरूटचा रस घेतला, त्यानंतर दोन आठवड्यांसाठी प्लेसबो रस.
वृद्धांमध्ये रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले, मात्र तरुणांमध्ये याचा तितकासा प्रभाव दिसला नाही. हा अभ्यास एका नामांकित वैद्यकीय जर्नलमध्ये देखील प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे याची सध्या जगभर चर्चा होत आहे.
संशोधकांचा नवा खुलासा
तज्ज्ञ अँडी जोन्स यांचे म्हणणे आहे की नायट्रेटयुक्त पदार्थ केवळ रक्तदाबावर परिणाम करत नाही, तर तोंडाच्या मायक्रोबायोमवरदेखील प्रभाव टाकतो. या मायक्रोबायोममधील बदलांमुळे शरीरात जळजळ कमी होते आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. दुसऱ्या संशोधिका अॅनी व्हॅनहाटालो यांचा सल्ला आहे की बीटरूट जर आवडत नसेल, तर पालक किंवा बडीशेप यासारख्या नायट्रेटयुक्त भाज्यांचा उपयोग पर्याय म्हणून केला जाऊ शकतो.