कोळ्याला आपण घरात पाहिलं की सहज दुर्लक्ष करतो, किंवा घाबरून त्याला झटकून टाकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा दिसायला छोटासा आणि अगदी साधा वाटणारा प्राणी, एकेकाळी समुद्राच्या खोल पाण्याचा सम्राट होता? होय, शास्त्रज्ञांच्या एका थक्क करणाऱ्या शोधानुसार, कोळ्याचा मेंदू आणि त्याची उत्क्रांती तब्बल 500 दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्रात सुरू झाली होती. या लहानशा जीवामध्ये इतकी प्राचीन आणि विस्मयकारक गोष्ट दडलेली आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

नवीन संशोधन नेमके काय?
या संशोधनामागे अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठ, लायकॉमिंग कॉलेज आणि इंग्लंडमधील किंग्ज कॉलेज लंडनमधील शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. त्यांनी एका जुना समुद्री जीव “मोलिकोनिया सिमेट्रिका” याच्या जीवाश्मांचा सखोल अभ्यास केला. या जीवाचा आकार बघितल्यावर तो कोळ्याशी फारसा साधर्म्य राखतो असं वाटणारही नाही. तो दिसायला जणू पिलबगसारखा आहे आणि त्याला लहानसं शरीर आणि बारीक पाय आहेत. पूर्वी त्याला घोड्याच्या नालाच्या खेकड्यांचा पूर्वज मानलं जात होतं. पण या संशोधनानंतर त्या विचारांना पूर्णत: नवं वळण मिळालं आहे.
सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने मोलिकोनियाच्या मज्जासंस्थेचा तपशील अभ्यासला असता, संशोधकांना एक वेगळाच शोध लागला. त्याच्या मेंदूचा आणि आजच्या कोळ्यांच्या मेंदूचा एक विशेष साम्य आढळून आला. विशेष म्हणजे या मज्जासंस्थेची रचना आणि तंत्र हे कीटक किंवा क्रस्टेशियनसारखं नव्हे, तर अरकनिड्स (म्हणजेच कोळी, विंचू, माइट्स, टिक्स यांचं कुटुंब) यांच्यासारखं आहे. यात एक पॅटर्न आढळला जो फक्त कोळ्यांच्या मेंदूमध्येच दिसतो. म्हणजे, कोळी वंशाचा उगम समुद्रातच झाला असावा, असं या संशोधनातून स्पष्ट होतं.
कोळ्यांची उत्क्रांती
ही माहिती केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही, तर आपल्या सध्याच्या जगात वावरणाऱ्या प्राण्यांचा इतिहास समजून घेण्यासाठीही फार मोलाची आहे. ज्या जीवाला आपण घरात पाहून घाबरतो, त्याचा इतिहास इतका प्राचीन आणि गुंतागुंतीचा असावा, हे कल्पनेपलीकडचं वाटतं. कोळ्यांचे पूर्वज हे फक्त समुद्रात वावरत नव्हते, तर त्यांच्या मेंदूची विशिष्ट रचना जमिनीवर येण्याआधीच तयार झाली होती.
मोलिकोनियाच्या शरीरात दोन पिंसरसारखे तोंडाचे भागही होते, जे आजच्या कोळ्यांमध्ये फॅन्ग्सच्या स्वरूपात दिसतात. शास्त्रज्ञ सांगतात की, जर ही कल्पना खरी असेल, तर मोलिकोनिया हा कोळ्यांच्या कुटुंबाचा फार जुना सदस्य होता. त्यामुळेच तो समुद्रात राहणाऱ्या खेकड्यांशी नाते सांगणारा ठरतो.
शेवटी एक रोमांचक कल्पना उभी राहते. हे जीव जमिनीवर येत गेले, सुरुवातीचे कीटक आणि मिलिपीड्स यांच्यावर शिकारीसाठी त्यांनी जाळं विणायला सुरुवात केली, आणि मग झाडांपासून ते आपल्या घरांपर्यंत त्यांनी जगात आपलं अस्तित्व निर्माण केलं. समुद्राच्या तळापासून जमिनीवर, आणि नंतर आपल्या घरांच्या कोपऱ्यांत कोळ्यांची ही उत्क्रांती खरंच आश्चर्यचकित करणारी आहे.