किशोर कुमार हे बॉलिवूडमधील एक असे नामवंत गायक होते ज्यांच्या आवाजाने आणि गायनशैलीने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनानंतर एक खास गाणे टीव्ही आणि रेडिओवर वारंवार वाजवले गेले, ज्यामुळे श्रोते भावनिक झाल्याशिवाय राहू शकले नाहीत. या गाण्याच्या शब्दांनी आणि किशोर कुमारच्या भावपूर्ण आवाजाने अनेकांचे अश्रू वाहू लागले होते.
किशोर कुमार यांचा प्रवास-

किशोर कुमार यांनी 1946 ते 1978 या काळात अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आणि त्यांना सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या काळातील अनेक प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखले गेले. त्यांच्या गायकीला आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. फक्त त्यांच्या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळेच नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेही ते चाहत्यांच्या हृदयात अमर झाले.
त्यांच्या गाण्यांमध्ये आनंद, प्रेम, वेदना, आणि हास्य या सर्व भावना आपल्याला अनुभवायला मिळतात. ‘पडोसन’ सारख्या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले तर राजेश खन्ना यांच्या रोमँटिक गाण्यांनी प्रेमाचे वेगळे अनुभव दिले. तसेच, संजीव कुमार यांच्यावर चित्रित ‘आंधी’ चित्रपटातील ‘तेरे बिना जिंदगी’ हे गाणे तर श्रोत्यांच्या मनाला प्रचंड भिडले.
13 ऑक्टोबर 1987 किशोर कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आपल्यापासून दूर गेले. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर टीव्ही आणि रेडिओवर त्यांचे गाणी सगळीकडे वाजू लागली, पण एका गाण्याने सर्वच जण प्रचंड भावनिक झाले होते.
‘पवित्र पापी’ मधील गाणं-
‘पवित्र पापी’ चित्रपटातील ‘तेरी दुनिया से होके मजबूर चला, मैं बहुत दूर, बहुत दूर दूर चला’ या गाण्याच्या प्रत्येक ओळीत आणि सुरात किशोर कुमारच्या भावना इतक्या खोलवर उमटल्या होत्या की त्याचा स्पर्श ऐकणार्यांच्या हृदयाला होतो. लोक जेव्हा हे गाणं ऐकत असत, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उफाळायचे.
हे गाणं संगीतकार प्रेम धवन यांनी तयार केले होते, तर त्याला आवाज किशोर कुमार यांनी दिला होता. किशोर कुमार यांच्या आवाजात गायलेले हे गाणे आणि त्यांचे संगीत अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या जाण्याने एक काळखंड संपला असला तरी, त्यांच्या गाण्यांमधून ते आजही चाहत्यांच्या मनात जीवंत आहेत.