पृथ्वीवर आयुष्य टिकून राहण्यामागे झाडांचे अनमोल योगदान आहे. त्यांच्याशिवाय श्वास घेणे, हवामानाचे संतुलन राखणे आणि निसर्गाचे चक्र टिकवणे अशक्य झाले असते. पण आज आपण अशा एका झाडाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे अस्तित्व केवळ विलक्षणच नाही, तर इतिहासाच्या अनंत कालखंडातही त्याने आपले स्थान टिकवले आहे. हे झाड केवळ हजारो वर्षांचे नाही, तर त्याच्याभोवती पसरलेली कथा देखील इतकी रोमहर्षक आहे की ती आपल्याला महाभारताच्या काळापर्यंत घेऊन जाते.

‘मेथुसेलाह’ वृक्षाचे आयुष्य
हे झाड म्हणजे ‘मेथुसेलाह’. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या एका अतिशय निर्जन आणि सुरक्षित भागात हे झाड उभे आहे. त्याचे वय सुमारे 5,000 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. म्हणजेच, जेव्हा पिरॅमिड बांधले गेले नव्हते, जेव्हा रामायण-महाभारतासारखे महाकाव्ये घडत होती, तेव्हापासून हे झाड पृथ्वीवर उभे आहे. त्यामुळे काहीजण या झाडाच्या आयुष्याला महाभारत काळाशी जोडतात.
इतिहासात, मेथुसेलाह अगोदर ‘प्रोमेथियस’ नावाचा एक वृक्ष होता, ज्याला जगातील सर्वात जुना वृक्ष मानले जात होते. पण एक काळ असा आला की तो वृक्ष कापला गेला आणि आता तो केवळ इतिहासाच्या पानांवर उरला आहे. त्यानंतरच मेथुसेलाहची ओळख जगासमोर आली.
हे झाड ‘ब्रिसलकोन पाईन’ प्रजातीतील आहे, जी अत्यंत कठीण हवामानातही तग धरू शकते. उंच पर्वतरांगांमध्ये थंडी, वाऱ्याचा मारा आणि कोरडे वातावरण सहन करत ते हजारो वर्षांपासून तग धरून आहे. त्याच्या अस्तित्वामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटते. इतके वर्षे एका जागी उभे राहणे, तग धरून राहणे हे निसर्गातील एक चमत्कारच म्हणावा लागेल.
कुठे आहे मेथुसेलाह हा वृक्ष?
इतके ऐतिहासिक महत्त्व असले तरी अमेरिकेच्या सरकारने या झाडाचे अचूक स्थान उघड केलेले नाही. यामागचा उद्देश स्पष्ट आहे, मेथुसेलाहला कोणत्याही प्रकारच्या मानवनिर्मित हानीपासून वाचवणे. काही संशोधनसंस्था, विशेषतः ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे झाड कॅलिफोर्नियाच्या ‘नेवाडा पर्वतरांगे’त असल्याचे मानतात.
आजही मेथुसेलाह हा वृक्ष जिवंत आहे, आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात जुने झाड म्हणून नोंदवले गेले आहे. त्याचे केवळ वय नव्हे तर त्याच्या भोवती असलेली मौन कहाणी, काळाच्या साक्षीने अनुभवलेले जगाचे बदल, ही सारी गोष्ट आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते.
झाडांच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर काही झाडे केवळ 10 ते 20 वर्षे जगतात, काहींचे आयुष्य 100 वर्षांपर्यंतही जाते. पण मेथुसेलाहसारखा वृक्ष 5,000 वर्षांपेक्षा अधिक काळ तग धरतो हे केवळ विज्ञानाचं नव्हे तर निसर्गाचं एक अद्वितीय चमत्कारच म्हणावा लागेल.