जंगलाचा विषय निघाला की आपल्या डोळ्यांपुढे सहजपणे दोन प्राणी सर्वात पहिले उभे राहतात, सिंह आणि वाघ. हे दोघंही जंगलातील रांगडे, भारदस्त आणि अभिमानाने मिरवणारे जीव आहेत. जंगल सफारीला जाणाऱ्यांच्या मनात या दोघांची प्रतिमा विशेष स्थान घेऊन असते. सिंहाची रुबाबदार चाल असो किंवा वाघाचा दबकत येणारा वावर या दोघांनाही पाहताना रोमांच उभा राहतो. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, या दोघांपैकी खरंच कोणाचा आवाज जास्त जबरदस्त असतो? कोणाच्या गर्जनेने खरंच जंगल हादरतं आणि माणसाचं काळीज दडपून जातं?

जंगलात शांतता असते, पण जेव्हा तिथे सिंह किंवा वाघ गर्जतो, तेव्हा ती शांतता एका क्षणात खळबळून जाते. हे आवाज केवळ कानात घुमत नाहीत, तर हृदयाच्या ठोक्यांना वेग देतात. जंगल सफारी करताना जर हा आवाज ऐकू आला, तर एका क्षणात भीती आणि थरार यांचा संगम होताना जाणवतो. विशेष म्हणजे, या आवाजामध्ये जंगलाचा खरा राजा कोण आहे, हे समजण्याचा एक धागा असतो.
वाघांची डरकाळी
वाघ, आपल्या गूढ नजरेसाठी आणि एकाकी शिकारीसाठी प्रसिद्ध, त्याची गर्जना जवळपास 3 किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येते. त्याचा आवाज इतका जोरात असतो की त्याच्या आवाजाने जंगलातील अनेक प्राणी सावध होतात. ही गर्जना काहीशा खोल आणि घनदाट आवाजासारखी वाटते, जी जणू कुठल्यातरी संकटाची पूर्वसूचना देत असते.
सिंहाची गर्जना
पण जर सिंहाबद्दल बोलायचं झालं, तर तो जंगलात केवळ त्याच्या गर्जनेनेच आपला दरारा निर्माण करतो. सिंहाची गर्जना ही वाघाच्या तुलनेत दुप्पट आवाजाने घुमते. जेव्हा सिंह गर्जतो, तेव्हा त्या आवाजाचा परिणाम केवळ 3-4 किलोमीटर नाही, तर तब्बल 8 किलोमीटरपर्यंत पोहोचतो. त्याची गर्जना इतकी प्रभावी असते की ती ऐकून जंगलातील अन्य प्राणी थरथर कापायला लागतात. हा आवाज केवळ शारीरिक नाही, तर मानसिक दडपण आणणारा असतो.
विज्ञान सांगतं की सिंहाची गर्जना जवळपास 114 डेसिबलपर्यंत पोहोचते.म्हणजेच एका खचाखच भरलेल्या 50,000 प्रेक्षकांच्या स्टेडियममध्ये लोक जेव्हा एकत्र ओरडतात, त्याच ताकदीचा आवाज सिंहाच्या तोंडून निघतो. असा आवाज ऐकताना माणूसही स्तब्ध होऊन जातो.
सिंहाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो समाजप्रिय प्राणी आहे. वाघ एकटा फिरतो, पण सिंह गटात राहणं पसंत करतो. ते त्यांच्या कळपासोबत शिकार करतात, विश्रांती घेतात आणि अन्न वाटून खातात. ते आठवड्यातून केवळ दोनदाच अन्न खातात. त्यांना दररोजच्या मांसाची गरज नसते. पण एकदा खाताना मात्र ते तब्बल 50 किलो मांस संपवतात. त्यांचा आहार अगदी जबरदस्त असतो, जसा त्यांचा आवाज आणि रुबाब.
म्हणूनच, सिंह आणि वाघ दोघंही जंगलाचे शिरपेच आहेत. पण जर गर्जनेच्या ताकदीची गोष्ट असेल, तर सिंहाची राजेशाही गर्जना वाघाच्या तुलनेत नक्कीच एक पाऊल पुढे आहे. ती गर्जना ऐकताना मनात भयही निर्माण होतं आणि त्या आवाजामागे दडलेली ताकदही अनुभवता येते.