कसोटीत सहाव्या नंबरवरून सर्वाधिक 50+ धावा करणारे टॉप-5 भारतीय फलंदाज!

Published on -

कसोटी क्रिकेट हा खेळ अनेक वेळा पहिल्या 4 किंवा 5 क्रमांकांवरच्या फलंदाजांभोवती फिरतो, पण खऱ्या कसोटीचा क्षण तेव्हा येतो जेव्हा संघ संकटात असतो आणि खालच्या फळीतला एखादा खेळाडू डाव सावरण्यासाठी पुढे येतो. अशा प्रसंगांमध्ये भारतीय संघासाठी काही खेळाडूंनी अनेकदा मोलाचे योगदान दिले आहे. आता या यादीत एक मोठा बदल घडला आहे. रवींद्र जडेजा याने कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले आहे.

रवींद्र जडेजा

आपल्या अष्टपैलू खेळामुळे अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलेला जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि लॉर्ड्स कसोटीत त्याने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, तो केवळ गोलंदाजीच नाही तर महत्त्वाच्या क्षणी फलंदाजीसुद्धा करू शकतो. या कसोटीत त्याने पहिल्या डावात 71 आणि दुसऱ्या डावात नाबाद 61 अशी खेळी करत, 6 व्या किंवा त्याखालील क्रमांकावर 29 व्यांदा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा टप्पा पार केला. त्यामुळे त्याने लक्ष्मणचा विक्रम मोडून या यादीत तिसरे स्थान पटकावले.

एमएस धोनी

या यादीत अग्रस्थानी आहे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी. धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 90 सामन्यांत 38 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या, ज्यात 33 अर्धशतके आणि 6 शतके होती. कसोटीत यष्टिरक्षक म्हणून आपल्या खेळाने आणि खालच्या फळीत केलेल्या धडाकेबाज फलंदाजीने त्याने अनेक वेळा टीम इंडियाला सावरले.

कपिल देव

दुसऱ्या क्रमांकावर आहे विश्वचषक विजेता अष्टपैलू कपिल देव. कपिलने 131 कसोटी सामन्यांत 35 वेळा 50 किंवा अधिक धावा केल्या, यात 28 अर्धशतके आणि 8 शतके होती. त्याची खेळी केवळ धाडसीच नव्हे तर त्या काळातील फलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरली.

व्हीव्हीएस लक्ष्मण

जडेजा नंतर चौथ्या क्रमांकावर आलेला व्हीव्हीएस लक्ष्मण, आपल्या कलात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने 134 कसोटीत 28 अर्धशतके आणि 17 शतके झळकावली, पण आता सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर 50+ धावा करण्याच्या बाबतीत तो जडेजामागे गेला आहे.

रविचंद्रन अश्विन

या यादीत एक महत्त्वाचे नाव आहे ते म्हणजे रविचंद्रन अश्विन. तो एक फिरकीपटू असला तरी अनेकदा त्याने खालच्या फळीत फलंदाजी करत संघाच्या डावाला आकार दिला. अश्विनने 106 कसोटीत 20 वेळा 50+ धावा केल्या आहेत. त्याने 14 अर्धशतके आणि 6 शतके झळकावली आहेत. डिसेंबर 2024 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, पण त्याची कामगिरी आजही आठवली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!