तोंडाचा वास सतत खराब येत असेल, दात कळकळत असतील किंवा हिरड्यांमध्ये सूज आणि रक्त येत असेल तर अनेकजण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतात. पण काही वेळा आपल्या स्वयंपाकघरातच असे घरगुती उपाय लपलेले असतात, जे केवळ प्रभावीच नाहीत, तर कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय असतात. लवंग आणि तुरटी या दोन नैसर्गिक घटकांचे पाणी हे असंच एक आश्चर्यकारक मिश्रण आहे, जे दातदुखीपासून तोंडाच्या दुर्गंधीपर्यंत अनेक समस्यांवर मात करतं.

लवंग आणि तुरटीचे पाणी
लवंग ही केवळ स्वयंपाकातील मसाला नाही. आयुर्वेदात ती एक शक्तिशाली औषधी म्हणून ओळखली जाते. यामध्ये असलेले युजेनॉल नावाचे तेल नैसर्गिक वेदनाशामक आहे. म्हणूनच, लवंग तोंडात ठेवताच किंवा त्याचं पाणी वापरल्यावर दातदुखीपासून लगेचच आराम मिळतो. युजेनॉलमुळे तोंडातील जंतूंशी लढण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
दुसरीकडे तुरटी ही आपण सहसा शुद्ध पाण्यासाठी वापरतो. पण तिचे औषधी उपयोग फारच प्रभावी आहेत. तुरटीमध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील हानिकारक बॅक्टेरियाचा नाश करतात. त्यामुळे हिरड्यांतील अल्सर, सूज, व्रण यावर तिचा उपयोग खूप गुणकारी ठरतो.
जेव्हा या दोन घटकांचं पाणी तयार केलं जातं आणि दररोज त्याने गुळण्या केल्या जातात, तेव्हा तोंडातली दुर्गंधी हळूहळू नाहीशी होते. श्वासात ताजेपणा जाणवतो आणि दिवसाची सुरुवात अधिक आत्मविश्वासाने होते. याशिवाय, दात व हिरड्यांचे आरोग्यही सुधारत जाते. या पाण्यामुळे हिरड्यांचा सैलपणा कमी होतो, रक्तस्त्राव थांबतो आणि दात अधिक घट्ट होतात.
पायोरियावर मिळतो आराम
पायोरिया किंवा हिरड्यांच्या जास्त त्रासदायक समस्यांमध्येही हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. काही दिवस या पाण्याने तोंड स्वच्छ केल्यावर हिरड्यांतील घाण आणि संसर्ग नष्ट होते. यामुळे पायोरियाचा प्रसार थांबतो आणि सूज ओसरते. ज्या लोकांना दातांमध्ये किड लागण्याची किंवा पोकळी होण्याची समस्या वारंवार होते, त्यांनीही हा उपाय नियमित केला तर बॅक्टेरिया वाढण्याची प्रक्रिया मंदावते आणि दात जंतांपासून सुरक्षित राहतात.
विशेष म्हणजे, जर कधी एखाद्या कारणाने ब्रश करणे शक्य नसेल प्रवासात असाल किंवा थकलेले असाल तरी या पाण्याने फक्त गुळण्या केल्यानेच तोंड स्वच्छ होतं. यामुळे प्लेक कमी होतो आणि तोंडाची आंतरिक स्वच्छता टिकून राहते.