26 डिसेंबर 2004 ची ती सकाळ… अनेक देशांसाठी कधीही न विसरता येणारी काळरात्र घेऊन आली. हिंद महासागर शांत होता, पण समुद्राच्या तळाखालून निसर्गाने एक भीषण गर्जना केली आणि काही क्षणांत सर्व काही बदलून गेले. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ समुद्राच्या खोलत 9.1 तीव्रतेचा भूकंप झाला आणि त्यानंतर उसळलेल्या महाकाय त्सुनामीच्या लाटांनी भारतासह 14 देशांमध्ये थैमान घातलं. जवळपास 2,30,000 निरागस लोकांचा यात जीव गेला.

2004 सालची त्सुनामी
त्या विनाशकारी आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला जेव्हा नुकताच रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ 8.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. समुद्राखाली झालेल्या या हालचालीमुळे जपानसह हवाई, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. जपानमध्ये 3 मीटर उंच लाटांचा अंदाज व्यक्त केला गेला होता, तरी प्रत्यक्षात लाटा 30-40 सेंटीमीटर इतक्या कमी होत्या. पण त्यामुळेच प्रशासनाची तत्परता आणि सजगता अधोरेखित झाली. जवळपास 9 लाख लोकांना किनारी भागांमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
भारतालाही बसला होता मोठा फटका
या घटनेमुळे 2004 मधील त्या विनाशकारी दिवसाची आठवण सर्वांच्या मनात पुन्हा जागी झाली. त्या दिवशी फक्त समुद्र उसळला नव्हता, तर लाखो आयुष्यंचे अस्तित्वच हरपले होते. भारतासाठीही तो दिवस विशेषतः भयावह ठरला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये लाटा इतक्या आत घुसल्या की संपूर्ण गावं नामशेष झाली. नागापट्टिनम, कन्याकुमारी आणि कुड्डालोर जिल्ह्यांमध्ये हजारो लोक प्राणाला मुकले.
अंदमान आणि निकोबार बेटांवर तर हाहाकार माजला होता. बेटांच्या दूरदूर पसरलेल्या रचनेमुळे मदतीचा हात पोहोचणं कठीण झालं. अनेक गावं समुद्रात गिळंकृत झाली, हजारो लोक बेपत्ता झाले आणि अनेकांचा पत्ता आजतागायत लागलेला नाही.
इंडोनेशियाला सर्वाधिक नुकसान
या आपत्तीचा सर्वाधिक फटका इंडोनेशियाला बसला. इथे एकट्याच 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. लाटांनी 800 किलोमीटरची किनारपट्टी अक्षरशः उद्ध्वस्त केली. श्रीलंका, थायलंड, मालदीव आणि आफ्रिकेतील काही देशही या प्रकोपातून वाचू शकले नाहीत. काही भागांत लाटांची उंची तब्बल 30 फूट (सुमारे 9 मीटर) इतकी होती. लाखो घरं जमीनदोस्त झाली, शाळा-रुग्णालयं नष्ट झाली आणि एक कोटीहून अधिक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
या भयंकर आपत्तीनंतर जगभरातून मदतीचे हात पुढे आले. 600 हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी मदतीत भाग घेतला. भारतानेही आपली आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम केली. याच अनुभवातून 2005 मध्ये INCOIS ची स्थापना झाली, ज्यामुळे समुद्राच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येऊ लागले. आता केवळ त्सुनामीच नव्हे, तर कोणत्याही समुद्री संकटाची वेळेवर माहिती मिळवून योग्य निर्णय घेणं शक्य झालं आहे.