UPI, फ्लाइट, EMI ते LPG…1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 6 नियम! पाहा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Published on -

1 ऑगस्टपासून आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, जे तुमच्या मासिक खर्चावर थेट परिणाम करू शकतात. UPI वापरणाऱ्यांसाठी काही नवीन नियम लागू होणार आहेत, तर दुसरीकडे क्रेडिट कार्डवरील मोफत विमा, एलपीजी सिलिंडरचे दर आणि विमान तिकिटांच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचा आढावा घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम तुमच्या घरच्या बजेटवर पडू शकतो.

UPI अ‍ॅपमधील व्यवहारांवर मर्यादा

सगळ्यात पहिला आणि कदाचित सर्वात जास्त लोकांना प्रभावित करणारा बदल म्हणजे UPI अ‍ॅपमधील व्यवहारांवर मर्यादा. 1 ऑगस्टपासून कोणतंही एक UPI अ‍ॅप वापरून तुम्ही दिवसभरात 50 पेक्षा जास्त वेळा बँक बॅलन्स चेक करू शकणार नाही. याचबरोबर ऑटो-पे व्यवहारांसाठी देखील वेळ निश्चित करण्यात येणार आहे. याचा अर्थ, EMI, सबस्क्रिप्शन किंवा कोणत्याही नियमित पेमेंटसाठी आता दिवसभराच्या कोणत्याही क्षणी व्यवहार न होता, ठराविक वेळेतच प्रक्रिया केली जाईल. शिवाय, जर एखादं पेमेंट अडलं, तर त्याची स्थिती दिवसात फक्त 3 वेळा, आणि तेही 90 सेकंदांच्या अंतरानेच तपासता येईल. NPCI च्या मते, सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या वेळात सर्वाधिक लोड असतो, म्हणून हे निर्बंध आणले गेले आहेत.

बँक खात्यांची यादी

याच पार्श्वभूमीवर आणखी एक बदल म्हणजे बँक खात्यांची यादी (List Account API) पाहण्यावरही मर्यादा. आता प्रत्येक अ‍ॅपमध्ये एका वापरकर्त्याला दिवसात फक्त 25 वेळा ही यादी पाहता येणार आहे, तेही केवळ वापरकर्ता स्वतः बँक निवडतो तेव्हाच. जर विनंती अयशस्वी झाली तर पुढील प्रयत्नासाठी वापरकर्त्याची संमती घ्यावी लागेल.

बँकिंग नियम

KYC म्हणजेच ‘Know Your Customer’ प्रक्रियेबाबतही बँकांनी आता अधिक कडक धोरणं स्वीकारली आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून जर कोणी ग्राहक वेळेत KYC अपडेट करत नसेल, तर त्याचं बँक खाते गोठवण्याची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे बँकेकडून आलेले KYC संदेश दुर्लक्षित करणं आता महागात पडू शकतं.

SBI बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, 1 ऑगस्टपासून त्यांच्या काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्डांवरील मोफत हवाई अपघात विमा कव्हर बंद करण्यात येणार आहे. SBI-UCO बँक, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक, PSB आणि अलाहाबाद बँकेसह मिळणाऱ्या ELITE आणि PRIME कार्डांवर मिळणारे ₹50 लाख ते ₹1 कोटीचे विमा कव्हर यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे या सुविधेवर अवलंबून असणाऱ्यांनी पर्यायी विमा घेण्याचा विचार करावा.

LPG किंमती

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात, आणि 1 ऑगस्टला त्यात बदल अपेक्षित आहे. जुलैमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ₹60 ची कपात झाली होती, पण घरगुती सिलिंडरच्या किमतीत काहीच बदल नव्हता. मात्र आता सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.

विमान इंधनाच्या किंमती

शेवटी, एअर टर्बाइन फ्युएल म्हणजेच विमान इंधनाच्या किमतीतही 1ऑगस्टपासून बदल होऊ शकतो. जर हे इंधन महागलं, तर विमान तिकिटंही महाग होण्याची शक्यता आहे. उलट इंधन स्वस्त झाल्यास तुमचं प्रवास बजेट थोडं हलकं होऊ शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!