आपले शरीर आपल्या आरोग्याबद्दल वेगवेगळ्या स्वरूपात बरे-वाईट संकेत देत असते. मात्र, आपण त्याकडे सहसा इतक्या गांभीर्याने पाहत नाही, कालांतराने याच गोष्टीचे परिणाम मोठ्या गंभीर आजाराच्या रूपात मग समोर येतात. त्यापैकी एक महत्त्वाचा संकेत आपल्या लघवीच्या रंगातून मिळतो. तुमची लघवी केवळ शरीरातील पाणी आणि टाकाऊ घटक काढून टाकत नाही, तर ती तुमच्या यकृताच्या आरोग्याबद्दलही खूप काही सांगते.

यकृत म्हणजेच लिव्हर आपल्या शरीराचा एक ‘सायलेंट वॉरियर’ आहे. तो काहीही त्रास न देता सतत काम करत असतो. अन्नाचे रूपांतर, विषारी पदार्थांची सफाई, प्रथिनांची निर्मिती, साखरेचा साठा आणि अनेक जीवनसत्त्वे याच यकृतामुळे शरिरात संतुलित राहतात. पण जेव्हा हा महत्त्वाचा अवयव थकतो, तेव्हा शरीर सौम्य पण ठळक संकेत देतो आणि त्यापैकी एक म्हणजे लघवीत होणारे बदल.
लघवीचा रंग देतो संकेत
जर तुम्हाला असे जाणवत असेल की लघवीचा रंग अचानक गडद पिवळा, तपकिरी किंवा अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ‘चहा’सारखा झाला आहे तर हे यकृत बिघडण्याचं प्राथमिक लक्षण असू शकतं. हे सामान्य डिहायड्रेशनमुळेही होतं, पण जर पाणी पिण्याच्या सवयी सामान्य असूनही असे होत असेल, तर हे यकृत नीट कार्य करत नाही याचा इशारा असू शकतो.
यकृत निकामी होऊ लागल्यावर काही लोकांच्या लघवीत सतत फेस तयार होतो. हे ‘प्रथिन गळती’चं लक्षण असू शकतं आणि यकृताची गंभीर अवस्था जसे की सिरोसिस किंवा यकृत निकामी होणं याचे संकेत असू शकतात. अशा वेळी यकृत पेशींमधून शरीरात विषारी घटक साचू लागतात, जे नंतर लघवीद्वारे बाहेर टाकले जातात त्यामुळे लघवीला तीव्र, असह्य वास येऊ शकतो.
लिव्हर खराब होण्याची लक्षणे
कधी कधी लघवी करताना जळजळही जाणवते. हे अमोनियाचा स्तर वाढल्याने होतं, कारण यकृत तो स्तर नियंत्रित करू शकत नाही. वारंवार अशी जळजळ जाणवत असेल, तर हे साधं यूरीन इन्फेक्शन नसून यकृताच्या बिघाडाचं लक्षण असू शकतं.
त्यामुळे लघवीचा रंग, वास, आणि त्यात होणारे बदल ही शरीराची मदतीसाठी दिलेली हाक असते. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं, नियमित तपासणी करणं, आणि आपली जीवनशैली सुधारणं यामुळे तुम्ही मोठ्या गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.