घरात 25 वर्ष वीज वापरा मोफत, सरकार देणार कर्ज आणि सबसिडीही; ‘पीएम सूर्य घर’ योजनेची संपूर्ण माहिती इथे वाचा!

Published on -

सौरऊर्जेचा उपयोग आता केवळ पर्यावरणपूरक पर्याय म्हणून नव्हे, तर गरिबांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी एक मोठी आर्थिक संधी म्हणून समोर येत आहे. याच संधीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘पंतप्रधान सूर्य घर योजना’ अनेकांसाठी एक नवा उजेड घेऊन आली आहे. वीज बिलाच्या चिंतेपासून मुक्ती, मोफत युनिट्स, अनुदान, आणि कमाई यांचा एकत्रित अनुभव देणारी ही योजना खरंच परिवर्तन घडवणारी ठरत आहे.

‘पंतप्रधान सूर्य घर योजना’

सौर पॅनेल म्हणजे काही मोजक्या श्रीमंतांची गोष्ट अशी एक वेळ होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. ही योजना प्रत्येक सामान्य नागरिकाला घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी केवळ परवानगीच देत नाही, तर त्यासाठी भरघोस आर्थिक मदतही उपलब्ध करून देते. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे एकदा सौर यंत्रणा बसवल्यानंतर पुढची 20-25 वर्षे तुम्हाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते. म्हणजेच, एसी, फ्रीज, टीव्ही, लाईट हे सर्व चालवूनही तुमच्या घराचा वीज खर्च शून्य होण्याची शक्यता आहे.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त वीज निर्माण केली, तर ती उरलेली वीज तुम्ही थेट सरकारला विकू शकता. यामुळे तुमच्या घराचे वीज बिल फक्त कमी होणार नाही, तर ती एक उत्पन्नाची साधनही ठरू शकते. देशभरात अशा 1 कोटी घरांमध्ये सौर पॅनेल बसवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे आणि यामुळे तब्बल 75,000 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.

योजनेचा लाभ कसा घेता येईल?

‘पीएम सूर्य घर’ योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे घराच्या छतावर पुरेशी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. यासोबतच तुमच्याकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे आणि तुम्ही याआधी सौर योजनांचा लाभ घेतलेला नसावा. ग्रामीण किंवा शहरी भागातील कुणीही या योजनेसाठी पात्र ठरू शकतो,अगदी फ्लॅटमध्ये राहणारे लोकही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्जाची प्रक्रिया काहीशी सविस्तर असली तरी एकदा का ती पूर्ण केली, की पुढचं काम DISCOM कंपनी पार पाडते. सौर पॅनेल बसवणारे अधिकृत विक्रेते याच पोर्टलवर उपलब्ध आहेत.

किती अनुदान मिळते?

सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात, 2 किलोवॅटपर्यंतच्या सौर यंत्रणेवर 60% आणि 3 किलोवॅटच्या यंत्रणेवर 40% अतिरिक्त अनुदान मिळते. सरासरी 3 किलोवॅटचा सोलर प्लांट बसवण्यासाठी सुमारे 1.45 लाख रुपये खर्च येतो, त्यापैकी 78,000 रुपये सरकार थेट तुमच्या खात्यात जमा करते.

ज्यांना एकरकमी खर्च शक्य नाही, त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. कारण बँका सौर यंत्रणा बसवण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज देखील देतात. यामध्ये रेपो दराच्या फक्त 0.5% जास्त व्याजदराने कर्ज मिळू शकते, जे सहज परवडणारे ठरते.

सौरऊर्जेचा फायदा केवळ तुमच्या घरापुरता मर्यादित राहणार नाही. जर तुम्ही मोठ्या क्षमतेचा प्लांट बसवला, तर त्यातून दरमहा हजारो, अगदी लाखो रुपयांची कमाईही शक्य आहे. हे उत्पन्न तुम्ही वापरलेल्या युनिट्स आणि सरकारला विकलेल्या वीजेच्या प्रमाणावर अवलंबून असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!