रोजच्या जेवणात नरम आणि पातळ पोळ्यांची मजा काही वेगळीच असते. पण काही घरांमध्ये पोळ्या इतक्या घट्ट किंवा कडक होतात की त्या चावणेही कठीण होते. कधी-कधी तर काही तासांपूर्वी केलेली पोळी देखील शिळी आहे की काय, अशी वाटते. अशावेळी प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, एकदम मऊ आणि नरम पोळ्या बनवण्यासाठी नक्की करावं तरी काय?, तर या लेखात आपण एकदम सोप्या आणि प्रभावी किचन टीपबद्दल जाणून घेणार आहोत.

काळं मीठ आणि साखर
रोजचं पीठ मळताना आपण अनेकदा काहीही न घालता फक्त मैदा किंवा गव्हाचं पीठ आणि पाणी वापरतो. पण एक्स्पर्ट सांगतात की, जर पीठात एक चिमूटभर काळं मीठ आणि थोडीशी साखर मिसळली, तर पोळ्यांचं रूपच पालटू शकतं. होय, या दोन छोट्या घटकांमुळे पोळ्या केवळ नरमच नाही तर हलक्या आणि पचायला सुद्धा सोप्या बनतात.
जेव्हा हे दोन्ही घटक पीठात घालून मळलं जातं आणि नंतर अर्धा तास झाकून ठेवलं जातं, तेव्हा त्यात एक प्रकारची सौम्य किण्वन प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया पोळ्यांना मऊ आणि स्पंजी बनवते. शिवाय, साखरेमुळे गव्हात नैसर्गिक गोडसर चव येते आणि काळ्या मिठामधील खनिजे पचनक्रियेस हातभार लावतात.
फायदे-
काळ्या मिठामध्ये असलेले सोडियम, पोटॅशियम आणि अन्य खनिजे अपचन, गॅस, आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून मुक्तता देऊ शकतात. त्यामुळे ही युक्ती केवळ चव आणि मऊपणासाठीच नव्हे, तर तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरते.
त्यामुळे पुढच्या वेळी पीठ मळताना चुकूनही या दोन गोष्टी विसरू नका, एक चिमूटभर काळं मीठ आणि थोडीशी साखर. मग पाहा, तुमच्या घरातल्या सगळ्यांना तुमच्या हातची पोळी इतकी आवडेल की जेवणाच्या वेळेस पहिल्यांदा पोळ्यांचाच आग्रह होईल.