दररोज सकाळची सुरुवात ही केवळ एक नविन दिवसाची सुरुवात नसते, ती आपल्या मनःस्थितीला, घरातील वातावरणाला आणि संपूर्ण दिनचर्येला आकार देणारा अत्यंत संवेदनशील क्षण असतो. त्यामुळे या पहिल्याच क्षणी आपण काय करतो, याला वास्तुशास्त्रानुसार फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. सकाळी डोळे उघडल्यानंतर पहिल्या काही मिनिटांत जर योग्य कृती केली गेली, तर ती केवळ आपला मूड नाही तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता देखील दूर करू शकते.

तळहातांकडे पाहा
भारतीय परंपरेनुसार, सकाळी जाग आल्यावर सर्वप्रथम आपले तळवे एकत्र करून त्याकडे पाहावे. हे केवळ एक धार्मिक संकेत नाही, तर त्यामागे एक भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. असे मानले जाते की तळहाताच्या पुढच्या भागात लक्ष्मीदेवी, मध्यभागी सरस्वतीदेवी आणि मुळाशी भगवान विष्णू यांचे वास्तव्य असते. त्यामुळे दिवसभर यश, विद्या आणि स्थैर्य मिळावे म्हणून हे दर्शन शुभ मानले जाते.
अंथरून नीट घालणे
त्यानंतर, उठताच आपल्या झोपेच्या जागेची स्वच्छता करणे हा एक अत्यंत साधा पण प्रभावी सवयीचा भाग आहे. अंथरुण नीट घालणे, आसपास विखुरलेल्या वस्तू जागेवर ठेवणे, हे सगळं केल्याने केवळ घर चकाकत नाही, तर मनातही एक शांतता निर्माण होते. वास्तुशास्त्र सांगतं की अस्ताव्यस्त वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा वसते आणि अशा घरात समाधान टिकत नाही.
सूर्यनमस्कार
जेव्हा शरीर उठायला तयार होतं, तेंव्हा सूर्यनमस्कारासारखी साधना ही ऊर्जा आणि सकारात्मकतेची खरी सुरुवात असते. सूर्याला नमस्कार करताना मन एकाग्र होतं, शरीर फुर्तीनं भरतं आणि आत्मा सजग होतो. सूर्य हा केवळ आकाशातील एक तारा नसून, तो आपल्या जीवनात आनंद आणि प्रेरणा घेऊन येतो. रोज फक्त काही मिनिटं सूर्यनमस्कारासाठी देणे, हे मानसिक शांततेसाठी अमूल्य ठरतं.
जमिनीबद्दल कृतज्ञता
त्याचबरोबर, जमिनीला स्पर्श करून माफीनिवेदन करणे ही एक नम्रतेची आणि कृतज्ञतेची खूण आहे. झोपेतून उठताना थेट जमिनीवर पाय ठेवण्याआधी, पृथ्वीला नमस्कार करणे आणि ‘माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, तर माफ कर’ असं मनोमन म्हणणं, हे आपल्या संस्कृतीत खूप सन्मानाने पाहिलं जातं. हे नातं माणूस आणि निसर्ग यांच्यातील पवित्र संवाद निर्माण करतं.
दार-खिडक्या उघडया ठेवा
दिवसाची अशी सकारात्मक सुरुवात करताना घरात ताजी हवा आणि सूर्यप्रकाश येणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी खिडक्या आणि दरवाजे उघडल्यावर बाहेरून येणाऱ्या शुद्ध हवेला प्रवेश मिळतो आणि आत दडपलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. या नैसर्गिक प्रकाशामुळे घरात एक नवा जिवंतपणा अनुभवायला मिळतो.
सकारात्मक विचार करा
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, सकाळी उठताच आपल्या मनावर कोणते विचार येतात, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. नकारात्मक विचार दिवसाची संपूर्ण दिशा बदलू शकतात. म्हणूनच सकाळी काही मिनिटं स्वतःसाठी ठेवून, मनात आनंददायी आणि प्रेरणादायक विचार रुजवणं ही एक उत्तम सवय ठरते.