वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिवसाचं एक विशिष्ट आध्यात्मिक महत्त्व असतं. विशेषतः मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस असे मानले जातात, जेव्हा विशिष्ट उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सौख्य, समृद्धी आणि समाधान नांदू लागतं. याच अनुषंगाने, घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकाचं चिन्ह काढणं हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो.

स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली प्रतीक आहे. याला शुभतेचं, समृद्धीचं आणि रक्षणाचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये याचे विशेष स्थान आहे. अशी धारणा आहे की स्वस्तिक घरात लावल्यास ते सकारात्मक ऊर्जा खेचून आणतो आणि दुष्ट शक्तींना घराच्या बाहेर ठेवतो.
मंगळवार आणि शनिवारचे उपाय
पण फक्त कोणत्याही दिवशी नाही, मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी खासकरून स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. यामागे आध्यात्मिक कारण आहे. मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे. तर शनी म्हणजे कर्म, न्याय आणि कर्माचे फळ देणारा ग्रह. या दोघांचे प्रभाव जबरदस्त असल्याने, त्यांच्या संबंधित दिवशी केलेले उपाय अधिक परिणामकारक ठरतात.
या दिवशी स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाजावर काढल्यानं घरात शुभ लक्षणांची सुरूवात होते. आर्थिक स्थिती सुधारते, अडकलेली कामं मार्गी लागतात, आणि मानसिक अस्वस्थतेला शांती मिळते. विशेष म्हणजे, अशा उपायांमुळे घरातील वातावरणही शुद्ध, प्रसन्न आणि प्रेरणादायक होतं.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
स्वस्तिक तयार करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम दरवाजा स्वच्छ करून त्यावर हळद, कुंकू, चंदन किंवा रोलीने स्वस्तिक काढावा. हे करताना ‘ॐ श्री गणेशाय नमः’ किंवा ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्रांचा जप करावा. त्याचबरोबर स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूंना ‘शुभ’ आणि ‘लाभ’ अशी अक्षरं लिहिल्यास, घरात आनंद आणि भरभराट नांदते.