वास्तुशास्त्रात दिशा ही केवळ जागेचा भाग नसून ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी जोडलेली आहे. घराचं बांधकाम असो की देवपूजा, झोपण्याची जागा असो की जेवण्याचं ठिकाण प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा ठरवलेली आहे. आणि त्यातही अन्न ग्रहण करताना योग्य दिशेचा विचार नाही केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. विशेषतः जर तुम्ही जेवत असताना तुमचं तोंड दक्षिणेकडे असेल, तर वास्तुशास्त्र सांगतं की तुम्ही अनाहूतपणे यमराजांना आमंत्रण देत आहात.

जेवताना दक्षिण दिशा टाळा
दक्षिण दिशा ही मृत्यूदेवता यमराजांची मानली गेली आहे. म्हणूनच, या दिशेला तोंड करून जेवण केल्याने केवळ शरीरावर रोगप्रकोप होतो असं नाही, तर आर्थिक संकट, कुटुंबातील मतभेद आणि जीवनात अडथळ्यांचाही संभव निर्माण होतो. विशेषत: ज्यांचे आई-वडील जिवंत आहेत, त्यांनी तर या दिशेला तोंड करून अन्न घेणं पूर्णतः टाळावं, अन्यथा कुटुंबावर वाईट काळ येण्याची शक्यता वाढते.
जेवणासाठी योग्य दिशा कोणती?
मग योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्र स्पष्ट सांगतं की, पूर्व आणि उत्तर दिशा या अन्नासाठी शुभ मानल्या जातात. पूर्व ही सूर्याची दिशा असल्यामुळे ती आरोग्याची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून अन्न घेतल्यास आजार दूर राहतात, शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. उत्तरेकडे तोंड करून जेवल्यास धनाची कमतरता राहत नाही, असे मानले जाते. उत्तरेला धनप्राप्तीची दिशा म्हणूनही महत्त्व दिलं जातं.
पश्चिम दिशा देखील अन्नासाठी योग्य आहे. धर्मशास्त्रांनुसार पश्चिम दिशा ही नफ्याची दिशा आहे. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर या दिशेला तोंड करून अन्न घेणं फायदेशीर ठरतं.
त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नग्रहणाची खोली पश्चिम दिशेला असावी, जेणेकरून कुटुंबात सुख, समृद्धी आणि आरोग्य कायम राहील.