इंग्लंडची भूमी, जी अनेक आशियाई फलंदाजांसाठी नेहमीच कसोटी ठरली आहे तिथे शुभमन गिलने इतिहासात आपले नाव ठळक अक्षरांनी कोरले आहे. मोहम्मद युसूफ, राहुल द्रविड, विराट कोहली आणि सुनील गावस्करसारख्या महान खेळाडूंनाही मागे टाकत गिलने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनण्याचा पराक्रम गाठला आहे.

सुनील गावस्कर
या यादीची सुरुवात होते महान फलंदाज सुनील गावस्करपासून. त्यांनी 1970 साली इंग्लंडमध्ये 4 कसोटीत 542 धावा करून त्या काळातला एक उच्चांक गाठला होता. त्यांच्या फलंदाजीला तेव्हा अनेकांनी सलाम केला होता.
त्यानंतर विराट कोहलीची 2018 मधील विस्मयजनक कामगिरी, जिथे त्याने 593 धावा करत सर्वांनाच प्रभावित केलं. मात्र, आता कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
राहुल द्रविड
या यादीत ‘द वॉल’ म्हणवले जाणारे राहुल द्रविडही मागे नाहीत. 2002 मधील इंग्लंड दौऱ्यात त्यांनी फक्त 3 कसोटीत तब्बल 603 धावा ठोकल्या. त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ याने 2006 च्या मालिकेत 631 धावा करत अव्वल स्थान पटकावलं. त्याच्या 202 धावांच्या खेळीला आजही क्रिकेटप्रेमी विसरलेले नाहीत.
शुभमन गिल
मात्र, या सगळ्यांच्या पलीकडे गेल्याने गिलने इतिहास घडवला. यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात, 4 कसोटी सामन्यांतील 8 डावांत त्याने 722 धावा ठोकून आशियातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यात विशेष लक्षात येण्याजोगं म्हणजे त्याने या मालिकेत एक नाही तर तब्बल 4 शतके झळकावली. हे केवळ आकड्यांचं प्रदर्शन नव्हतं, तर त्यामागे असलेला त्याचा संयम, तंत्र, आणि मानसिक ताकदही तितकाच महत्त्वाचा होता.