स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली मैदानावर जितका चमकतो तितकाच तो सोशल मीडियावरही प्रभावी आहे. चाहत्यांची अपार लोकप्रियता आणि त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमुळे विराट केवळ खेळापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता तो एका विशाल डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणूनही ओळखला जातो. आणि तुम्हाला हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल इंस्टाग्रामवर फक्त एका ब्रँडेड पोस्टसाठी विराट कोहली जेवढी रक्कम घेतो, ती तुमचे डोळे विस्फारायला लावेल.

आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोठमोठ्या ब्रँडना जाहिरातीसाठी प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेणे अत्यावश्यक वाटते. आणि या ब्रँडना जेव्हा त्यांच्या उत्पादनांची पोहोच वाढवायची असते, तेव्हा ते अशा सेलिब्रिटींशी संपर्क साधतात, ज्यांचे फॉलोअर्स कोट्यवधींनी असतात. अशा व्यक्तींच्या एका पोस्टमुळे उत्पादनावर विश्वास निर्माण होतो आणि विक्रीत वाढ होते. भारतात याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली.
विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू
क्रिकेट हा भारतात केवळ खेळ नाही, तर एक भावना आहे. आणि विराट कोहली या भावनेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे जाहिरात कंपन्यांना विराटसोबत काम करणं म्हणजे ब्रँडला एक नवा शिखर गाठण्याचा मार्ग असतो. त्यामुळेच विराटच्या एका पोस्टसाठी कंपन्या तब्बल 12 कोटी रुपये देण्यास तयार असतात.
विराटचे इंस्टाग्रामवर तब्बल 274 दशलक्ष (27.4 कोटी) फॉलोअर्स आहेत. ही संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो जगातील सर्वात प्रभावी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपैकी एक मानला जातो. इंस्टाग्रामवरून कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट सध्या 14 व्या स्थानावर आहे आणि या यादीतील एकमेव भारतीय आहे.
तुलना करता, जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो, जो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी तब्बल 27 कोटी रुपये घेतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सी आहे, जो एका पोस्टसाठी 22 कोटी रुपये घेतो. त्यांच्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो, ज्याचा डिजिटल प्रभाव जगाच्या पातळीवर मान्य केला जातो.
टेस्ट आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती
गमतीशीर बाब म्हणजे विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने नुकतेच कसोटी क्रिकेट आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तरीदेखील त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही घट झाली नाही, उलट त्याच्या सोशल मीडिया प्रभावामुळे तो अजूनही जाहिरातदारांचा आवडता चेहरा आहे.
विराट कोहलीसारखा खेळाडू केवळ त्याच्या कौशल्याने नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावामुळेही लाखो-कोट्यवधी लोकांच्या मनात घर करून बसतो. त्यामुळे त्याची एका पोस्टची किंमत जितकी मोठी आहे, तितकाच त्याचा प्रभावही गगनाला भिडलेला आहे. आणि त्यामुळेच तो आजही “ब्रँड विराट” म्हणून ओळखला जातो.