आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या झपाट्याने वाढते आहे. त्यातही PCOD आणि PCOS ही अशी स्थिती आहे ज्या अनेक महिलांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करतात. मासिक पाळी नियमित न होणे, चेहऱ्यावर मुरुम, केस गळणे, पोटावर चरबी साठणे यांसारख्या लक्षणांनी या आजाराची सुरुवात होते आणि योग्य वेळी नियंत्रण न घेतल्यास ही समस्या आणखी बळावू शकते. पण नैसर्गिक पद्धतीने, कोणतीही औषधं न घेता तुम्ही तुमच्या शरीरात बदल घडवू शकता, त्यासाठी योग हा एक प्रभावी पर्याय ठरतो.

PCOD आणि PCOSच्या मुळाशी हार्मोनल असंतुलन, तणाव, आणि आळशी जीवनशैली हे घटक असतात. योग या तिन्ही समस्यांवर एकाच वेळी काम करतो. योग करताना शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कोर्टिसोलसारखे तणावजन्य हार्मोन नियंत्रित होतात आणि अंडाशय व गर्भाशयाभोवतीचा रक्तप्रवाह सुधारतो. हे हार्मोनल संतुलनासाठी खूप उपयुक्त ठरतं. शिवाय, वजन कमी होण्यास देखील मदत होते, जे या आजारात फार गरजेचे आहे.
बाउंड अँगल पोझ
या त्रासावर प्रभावी ठरणारी पहिली क्रिया म्हणजे बाउंड अँगल पोझ. या आसनात जमिनीवर बसून दोन्ही पाय एकमेकांना भिडवून गुडघे जमिनीकडे झुकवले जातात. या प्रक्रियेमुळे पेल्विक भागात अधिक रक्तपुरवठा होतो आणि प्रजनन अवयव सक्रिय होतात. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनाही कमी होतात.
भुजंगासन
दुसरे आसन म्हणजे भुजंगासन, ज्याला कोब्रा पोझ असेही म्हणतात. पोटावर झोपून धड वर उचलण्याच्या या आसनामुळे पोटातील अवयवांवर सौम्य दाब पडतो. त्यामुळे अंडाशयांची कार्यक्षमता वाढते. हे आसन थायरॉईड ग्रंथीवर देखील सकारात्मक परिणाम करते, जी PCOSमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
सर्वांगासन
तिसरे आणि अत्यंत प्रभावी आसन म्हणजे सर्वांगासन. या स्थितीत शरीर उलट्या दिशेने ठेवले जाते आणि पाय हवेत उचलले जातात. या आसनाला ‘सर्व आसनांची जननी’ म्हटले जाते कारण यामुळे थायरॉईड, पाइनल ग्रंथी यांसारख्या अंतःस्रावी ग्रंथी सक्रिय होतात. हे संपूर्ण हार्मोनल यंत्रणेवर सकारात्मक परिणाम करतं. तणाव, चिंता यांसारखे मानसिक त्रासही दूर होतात. PCOD किंवा PCOSचा त्रास असणाऱ्या महिलांनी या आसनांचा नियमित सराव करणे सुरू केल्यास त्यांना बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.