केस गळती, कोरडेपणा आणि नैसर्गिक चमक हरवलेली वाटत असेल, तर पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट्सऐवजी घरच्याघरी काही साधे आणि सहज करता येणारे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील. आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही नैसर्गिक घटक हे केसांसाठी अमूल्य ठरतात. पण त्याचा उपयोग नियमित आणि योग्य पद्धतीने केला, तरच खरा फरक जाणवतो. चला तर मग, केसांना नवसंजीवनी देणाऱ्या या घरगुती सवयी समजून घेऊया.
नारळ तेल

सुरुवात करा नारळाच्या उबदार तेलाने. आठवड्यातून दोन वेळा फक्त 10 मिनिटं घेतलीत, तरी हो छोटीशी सवय तुमच्या केसांचे आरोग्य बदलवू शकते. थोडं गरम केलेलं नारळ तेल टाळूमध्ये हलक्या हाताने मसाज करून लावल्याने मुळांपर्यंत पोषण पोहोचतं आणि केस अधिक मजबूत आणि चमकदार होतात. नंतर कमीत कमी एक तास ठेवा आणि सौम्य शॅम्पूने धुवा.
आवळा आणि दहीचा हेअर पॅक
पुढचा उपाय म्हणजे आवळा आणि दही यांचा हेअर पॅक. आवळ्याच्या पावडरमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं, जे केसांची मुळे बळकट करतं. दही त्यात ओलावा देते आणि कोरडेपणा दूर करतं. ही दोघांची जोडी केसांसाठी वरदान ठरते. एकसारखी पेस्ट करून 30 मिनिटांसाठी केसांना लावा आणि नंतर नीट धुवा.
कांद्याचा रस
कांद्याचा रस देखील केस गळती थांबवण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आहे. कांद्याच्या रसामुळे टाळूतील रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळे नवीन केस येण्याचा वेग वाढतो. याचा वास थोडा असह्य असतो पण परिणाम पाहता तो वास नक्कीच सहन करता येतो.
कोरफड जेल
कोरफडीच्या जेलचा वापर डीप कंडिशनिंगसाठी करा. कोरफड टाळू शांत करते, खाज कमी करते आणि केस मऊ व रेशमी बनवते. आठवड्यातून एकदा ती टाळूवर लावा, 30 मिनिटं ठेवून थंड पाण्याने धुवा.
मेथीच्या बिया
तुमच्याकडे मेथीच्या बिया असतील तर त्या रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी बारीक वाटून केसांना पेस्टसारखी लावा. कोंडा, केस गळणे हे सगळं टप्प्याटप्प्याने कमी होईल.
रीठा आणि शिकाकाई
यासोबत, आठवड्यातून एकदा तरी रीठा आणि शिकाकाई वापरून केस धुण्याची सवय लावा. हे दोन्ही घटक नैसर्गिक क्लींझर आहेत जे केस स्वच्छ करताना त्यांचा पोत आणि मजबुती देखील टिकवून ठेवतात. हे रासायनिक शॅम्पूपेक्षा अनेक पटींनी चांगले असते.
कोमट किंवा थंड पाणी वापरा
एक अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे गरम पाण्याने केस धुणं थांबवा. गरम पाणी केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकतं, आणि केस अजून कोरडे, तुटणारे होतात. त्याऐवजी कोमट किंवा थंड पाणी वापरा.
शेवटी, हर्बल तेलात कढीपत्ता आणि गवताचे पाते घालून उकळा. कढीपत्त्यामुळे केस काळे आणि बळकट राहतात, तर त्यातलं विटॅमिन बी केस गळती रोखण्यास मदत करतं. हे तेल आठवड्यातून दोन वेळा वापरल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.