पावसाळ्यात सर्दी, ताप आणि आजारांपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग रोज सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ पेय नक्की प्या!

पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा, वातावरणात आर्द्रता आणि रस्त्यावर जिकडे-तिकडे साचलेली घाण असं चित्र दिसून येतं. आणि त्यातच सुरू होतो आजारांचा हंगाम सर्दी, ताप, खोकला, जंतुसंसर्ग, पचन बिघडणं… या सगळ्याचा त्रास अनेक घरांमध्ये हमखास होतो. पण जर तुमचं शरीर आतून मजबूत असेल, रोगप्रतिकारक शक्ती पक्की असेल, तर तुम्ही सहज या सगळ्यापासून स्वतःला वाचवू शकता.

 

यासाठी तुम्हाला फार काही महागडं किंवा क्लिष्ट करण्याची गरज नाही. एका अगदी साध्या, पण प्रभावी हेल्दी पेयाने तुमचं शरीर हंगामाच्या संकटांना सामोरं जायला तयार होऊ शकतं. हे पेय म्हणजेच मध आणि लिंबूपाणी.

मध आणि लिंबूपाणी

लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतं, जे शरीरात रोगांशी लढण्यासाठी शक्ती निर्माण करतात. तर मधामध्ये असतात सूक्ष्मजंतूंशी लढणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि नैसर्गिक गोडवा, जो थकवा घालवतो. हे दोघं जेव्हा कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी शरीरात जातात, तेव्हा शरीर डिटॉक्स होऊ लागतं, पचनसंस्था सक्रिय होते आणि तुमचं चयापचय अधिक चांगलं काम करतं.

‘असं’ तयार करा हे आरोग्यदायी पेय

 

हे आरोग्यदायी पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात 1 चमचा शुद्ध मध आणि अर्धा लिंबाचा रस मिसळा. नंतर मिश्रण नीट ढवळून घ्या आणि प्या. पण लक्षात ठेवा, पाणी उकळते असायला नको, ते फक्त कोमट असावं, नाहीतर मधातील पोषणमूल्यं कमी होऊ शकतात.

या पेयाचं नियमित सेवन केल्यानं शरीराला हंगामी सर्दी, ताप, जंतुसंसर्ग यांच्याशी लढण्याचं नैसर्गिक बळ मिळतं. पचन सुधारतं, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि शरीरातला गॅस किंवा आम्लता कमी होतो. काही आठवड्यांत याचा परिणाम वजनावरही दिसतो. भूक नियंत्रणात राहते आणि चरबी वितळू लागते. याशिवाय, त्वचेवर एक वेगळाच तेज येतो जी स्वच्छ, मोकळी आणि तजेलदार दिसते.