विदेशात शिकायचंय? मग या 6 शहरांचा नक्की विचार करा! शिक्षण, सुरक्षितता आणि सोयीमध्ये आहेत सर्वात बेस्ट

परदेशात शिक्षणासाठी मुलाला पाठवण्याचा निर्णय हा प्रत्येक पालकासाठी भावनिकदृष्ट्या फारच मोठा असतो. आपलं मूल अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत एकटं राहणार हे चिंतेचं कारण बनतं. अशा वेळी त्या देशातील वातावरण किती सुरक्षित आहे, स्थानिक लोकांची विद्यार्थ्यांविषयीची वृत्ती कशी आहे, ही अत्यंत महत्त्वाची ठरते. हेच लक्षात घेऊन QS रँकिंगने जगातील काही सर्वाधिक विद्यार्थी-अनुकूल आणि सुरक्षित शहरांची यादी सादर केली आहे. ही शहरे केवळ शिक्षणाच्या संधी देत नाहीत, तर विद्यार्थ्यांना घरासारखे उबदार वातावरणही देतात.

सोल

या यादीत सर्वात वर आहे सोल, दक्षिण कोरियाचं राजधानी शहर. आधुनिकतेचा शिखर गाठलेलं हे शहर केवळ तंत्रज्ञानातच पुढं नाही, तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही आदर्श मानलं जातं. सोलचा ‘विद्यार्थी वृत्ती स्कोअर’ 79.3 असून त्याचा एकूण गुण 100 आहे.म्हणजेच सोलमध्ये राहणं म्हणजे शिक्षणासोबतच एका सुरक्षित समाजात जगण्याची संधी मिळणं.

टोकियो

या यादीत दुसरं नाव आहे टोकियो. शिस्तप्रिय आणि संस्कृतीने भरलेलं जपानचे हे शहर विद्यार्थ्यांसाठी जगातील दुसरं सर्वाधिक सुरक्षित शहर मानलं जातं. इथला विद्यार्थी वृत्ती स्कोअर 87.1 असून एकूण गुण 99.1 आहे. टोकियोमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण तर मिळतंच, शिवाय स्थानिक लोकांकडून सन्मान आणि सहकार्यही अनुभवायला मिळतं.

लंडन

तिसऱ्या क्रमांकावर आहे लंडन, इंग्लंडचं ऐतिहासिक आणि आधुनिकतेचं संगम असलेलं शहर. लंडनचा विद्यार्थी स्कोअर 98.3 असून एकूण गुण 97.1 आहे. इथे जगभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत खुलेपणाने केलं जातं. विविध संस्कृतींचा अनुभव घेत शिक्षण घेण्याची संधी ही लंडनच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

म्युनिक

जर्मनीचं म्युनिक हे शहर चौथ्या स्थानावर असून याचा विद्यार्थी वृत्ती स्कोअर 94.8 आणि एकूण स्कोअर 96.3 आहे. शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात विद्यार्थी सुरक्षिततेसोबतच एक दर्जेदार जीवनशैली अनुभवतात.

मेलबर्न

पाचव्या स्थानावर असलेलं मेलबर्न, ऑस्ट्रेलिया हे शांततापूर्ण आणि समावेशक शहर मानलं जातं. इथं विद्यार्थी वृत्ती स्कोअर 98.2 असून एकूण गुण 95.7 आहे. मेलबर्नमधील शिक्षणसंस्था, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैत्रीपूर्ण वातावरण अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करतं.

सिडनी

सहाव्या क्रमांकावर सिडनीचं नाव झळकतं. ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात विद्यार्थी वृत्ती स्कोअर 96.5 असून एकूण स्कोअर 94.7 आहे. सुंदर समुद्रकिनारे, जीवनशैलीतील सहजता आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांप्रती आदरभाव ही सिडनीची खासियत मानली जाते.