कधी कधी प्रेमातलं दुःख इतकं खोल जातं की माणूस रेषा पार करून विकृत मार्ग स्वीकारतो. चेन्नईमधील एका हुशार, प्रशिक्षित तरुणीची अशीच एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे, जी वाचून थक्क व्हायला होतं. एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यानंतर, ती इतकी सुडबुद्धीने भरली की तिने स्वतःच्या प्रियकराला अडकवण्यासाठी तब्बल 12 राज्यांमध्ये खोट्या बॉम्ब धमक्यांची योजना आखली आणि या साऱ्या कारवायांमध्ये तिने तांत्रिक कुशलतेचा असा काही उपयोग केला की गुप्तचर यंत्रणाही बुचकळ्यात पडल्या.

प्रेमभंगानंतर तरुणीने घेतला अनोखा सूड
या प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती म्हणजे रेने जोसिल्डा, जी चेन्नईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. ती रोबोटिक्समध्ये तज्ञ असल्यामुळे, पोलिसांपासून लपण्यासाठी तिने डार्क वेब, व्हर्च्युअल आयडेंटिटी आणि बनावट ईमेल आयडींचा उपयोग केला. पण शेवटी तपासकर्त्यांनी तिचा शोध घेतलाच आणि त्या मागचं सत्य उघड पडलं.
हे सगळं सुरू झालं फेब्रुवारी 2025 मध्ये, जेव्हा रेनेच्या सहकाऱ्याने दिविज प्रभाकरने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. त्यावेळी रेनेचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम सुरू होतं, पण नकाराने तिच्या मनात सूडाची ठिणगी पेटली. त्यानंतर तिने प्रभाकरच्या नावानेच ईमेल आयडी तयार केले आणि देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब असल्याचे ईमेल पाठवायला सुरुवात केली. दिल्लीपासून पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूपर्यंत जवळपास 12 राज्यांमध्ये 21 हून अधिक खोट्या धमक्या पाठवल्या गेल्या, आणि पोलिसांचा गोंधळ उडाला.
एअर इंडियाचं विमान मीच पाडलं…
यात धक्कादायक टप्पा तेव्हा आला, जेव्हा एअर इंडियाचं विमान कोसळल्याची बातमी आली आणि त्यानंतर रेनेने बी.जे. मेडिकल कॉलेजला एक ईमेल पाठवला, ज्यात तिने दावा केला की विमान अपघात तीनेच घडवला आहे. तिच्या शब्दांमध्ये “आता तरी माझी शक्ती समजली असेल ना? आम्ही खेळत नव्हतो.” यामुळे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या.
या कालावधीत मे ते जून 2025 दरम्यान ती वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब धमक्या पाठवत होती. एकीकडे देशात घबराट पसरत होती, तर दुसरीकडे ती स्वतःला अबाधित ठेवून आपले ‘मिशन’ पुढे नेत होती. पण पोलिस तपासानंतर, सर्व तांत्रिक गोष्टींचा मागोवा घेत अखेर तिला अटक करण्यात आली आहे.