ओटीटीवरील मनोरंजनाची दुनिया दर आठवड्याला नव्या आकड्यांनी आणि ट्रेंडने बदलते. प्रेक्षक कोणत्या सिरीजवर प्रेम करत आहेत, कोणता शो चर्चेत आहे आणि कोणता शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. याच पार्श्वभूमीवर 7 जुलै ते 13 जुलै 2025 या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मूळ वेब सिरीजची यादी समोर आली आहे. विशेष म्हणजे, नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध ‘स्क्विड गेम’ला मागे टाकत अमेझॉन प्राइमवरील भारतीय वेब सिरीजने अव्वल स्थान पटकावलं आहे.

‘पंचायत सीझन 4’
या आठवड्याच्या यादीत सर्वाधिक चमकलेली मालिका म्हणजे ‘पंचायत सीझन 4’. ग्रामीण भारताच्या शांत, पण खूप काही सांगणाऱ्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाने स्वीकारली आहे. जितेंद्र कुमार याच्या “सचिवजी”च्या भूमिकेला पुन्हा एकदा भरभरून दाद मिळाली आहे. नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय यांच्यासह संपूर्ण टीमच्या अभिनयाने या सिरीजला 4.2 दशलक्ष व्ह्यूज मिळवून दिले आहेत. ही मालिका केवळ एक कथा नसून, एक अनुभव बनली आहे जिथे गावातील साधेपणा, संघर्ष आणि हसरे क्षण हातात हात घालून चालतात.
‘स्क्विड गेम सीझन 3’
दुसऱ्या क्रमांकावर आहे ‘स्क्विड गेम सीझन 3’. या कोरियन थ्रिलरने आधीपासूनच जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन सीझनमध्येही तीच थरारकता कायम असून, 3.0 दशलक्ष व्ह्यूजसह ही मालिका टॉप-2मध्ये पोहोचली आहे. मानवी स्वभावाच्या टोकाच्या अनुभवांना भिडवणारी ही मालिका एकदा बघायला सुरुवात केली, की थांबणं कठीणच.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3’
कॉमेडीच्या जगात नेहमीच आपली छाप सोडणारा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3’ या आठवड्यातही लोकप्रियतेच्या यादीत आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या या शोने 2.5 दशलक्ष व्ह्यूजसह तिसरे स्थान पटकावले आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमचा विनोदाचा अंदाज, सेलिब्रिटी गप्पा आणि हलकाफुलका माहोल प्रेक्षकांसाठी नेहमीच उत्साहवर्धक असतो.
‘द हंट – राजीव गांधी मर्डर केस’
चौथ्या क्रमांकावर आहे ‘द हंट – राजीव गांधी मर्डर केस’. 4 जुलै 2025 रोजी रिलीज झालेली ही थरारक मालिका एका वास्तविक ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या तपासावर आधारित ही सिरीज प्रेक्षकांना एका वेगळ्या काळात नेऊन सोडते. अमित सियाल, साहिल वैद यांसारख्या गुणी कलाकारांनी तीव्रतेने साकारलेले पात्र आणि तपास प्रक्रियेची रंजक मांडणी यामुळे या मालिकेला 1.7 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
‘गुड वाईफ’
पाचव्या क्रमांकावर ‘गुड वाईफ’ ही सिरीज आहे, जी अमेरिकन शोच्या भारतीय रिमेक म्हणून ओळखली जाते. काजोलच्या दमदार अभिनयामुळे ही सिरीज प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल जगातील तणाव यावर आधारित ही सिरीज 1.5 दशलक्ष व्ह्यूजसह यादीत आपली जागा टिकवून आहे.