100 रुपयांत मालदीवमध्ये काय-काय खरेदी करता येईल?, जाणून घ्या भारतीय रुपयाचे मूल्य!

Published on -

जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे एकदा तरी जायचंच असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मालदीव म्हणजे त्यापैकीच एक. निळ्याशार समुद्राचा आसमंत, पांढरीशुभ्र वाळू, लक्झरी रिसॉर्ट्स आणि शांततेचा एक अनोखा अनुभव. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर आहेत आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा या निळ्या स्वप्नासारख्या बेटांबाबत उत्सुकता वाढली आहे. पण जर तुमच्या खिशात फक्त 100 रुपये असतील, तर मालदीवमध्ये तुम्हाला नेमकं काय मिळेल? हे उत्तर कदाचित तुमच्या कल्पनाही पार करेल.

सर्वप्रथम, थोडं चलनाविषयी बोलूया. मालदीवमध्ये ‘रुफिया’ हे अधिकृत चलन वापरलं जातं, ज्याला MVR असं म्हटलं जातं. या नोटा आणि नाण्यांवर समुद्राशी संबंधित चित्रं जसे की मासे, डॉल्फिन्स, जलक्रीडा हे सगळं अगदी रंगीत आणि देखणं असतं. या बेटांचं जीवन आणि संस्कृती त्याच्या चलनातही छानपैकी उतरलेली दिसते.

पंतप्रधान मोदींचा दौरा

पंतप्रधान मोदी यांचा हा मालदीवचा तिसरा दौरा असून, ते मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या औपचारिक भेटीच्या निमित्ताने भारत आणि मालदीवमधील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा अधोरेखित झालेत. पण राजकारण बाजूला ठेवून, मालदीवची खरी ओळख आहे ती पर्यटकांच्या स्वप्नातील जागा म्हणून.

दरवर्षी हजारो भारतीय प्रवासी आपल्या सुट्ट्यांमध्ये मालदीवला भेट देतात. पाण्यात बांधलेली लक्झरी हॉटेल्स, निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले दिवस आणि अगदी खासगी वाटावं असं प्रत्येक बेट हे सगळं अनुभवण्यासाठी भारतीय रुपयांचं मालदीवच्या रुफियामध्ये रूपांतर करणं गरजेचं असतं.

भारतीय रुपयाचे मूल्य

सध्या 1 भारतीय रुपया जवळपास 0.17 मालदीवियन रुफियाच्या आसपास आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे 100 रुपये असतील, तर त्याचे तुम्हाला सुमारे 17.82 MVR मिळतील. थोडक्यात सांगायचं झालं, तर या रकमेत तुम्हाला स्थानिक कॅफेमध्ये एक सोपं पेय, छोटं स्नॅक किंवा छोट्या स्थानिक दुकानातून एखादी वस्तू मिळू शकते. अर्थात, मालदीव महागडं आहे हेही तितकंच खरं. म्हणून, पर्यटनाचा पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर खर्चाची तयारी ठेवायलाच हवी.

जर तुम्ही मोठी रक्कम बदलणार असाल जसं की 1,000 रुपये तर त्याचे जवळपास 178 MVR मिळू शकतात. पण विनिमय दर सतत बदलत असल्यामुळे मालदीवमध्ये पोहोचल्यानंतर अधिकृत मनी एक्सचेंज काउंटर किंवा बँकेतून दर निश्चित करूनच चलन बदलणं कधीही शहाणपणाचं ठरतं.

विमानतळ, हॉटेल्स किंवा अधिकृत एजन्सीज हे यासाठी योग्य ठिकाणं आहेत. काही ठिकाणी अमेरिकन डॉलरही स्वीकारले जातात, पण स्थानिक खर्चासाठी MVR हातात असणं अधिक सोयीचं असतं. म्हणूनच, तुम्ही मालदीवला जायचा विचार करत असाल, तर केवळ प्रवासाची तयारी पुरेशी नाही, तर चलन आणि स्थानिक खर्च याचं नीट नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!